वेळ आल्यास शिवसेना भवनही फोडू - प्रसाद लाड
"आम्ही माहीममध्ये आलो तर त्यांना वाटतं की आम्ही शिवसेना भवन फोडायला आलो आहोत की काय. पण वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू," असं वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलं आहे.
भाजपच्या माहीम कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केलं.
भाजपची महाराष्ट्रातली ताकद दुप्पट झाल्याचं सांगत प्रसाद लाड पुढे म्हणाले, "भाजपची ताकद काय आहे, ही 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं होतं. आता तर 'सोने पे सुहागा' झालाय. कारण नारायण राणे आणि त्यांना मानणारा मोठा गट भाजपात आलाय. त्यामुळे भाजपची ताकद दुप्पट झालीय."
मात्र, या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलंय.याच कार्यक्रमात भाजप आमदार नितेश राणेही उपस्थित होते.
नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं, "मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनासमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठे?"
"बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे," असंही नितेश राणे म्हणाले.