शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (16:01 IST)

अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील 45 कर्मचाऱ्यांना कोरोना

अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील 45 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. अमरावती विद्यापीठात मागील आठवड्यात तीन दिवस कर्मचार्‍यांची सामूहिक कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. यात विद्यापीठातील तब्बल 45 कर्मचारी तर त्यांच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही असे एकूण 59 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
 
मागील आठवड्यात झालेल्या कोरोना चाचणीत विद्यापीठातील एकंदरीत 289 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. विद्यापीठात 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 289 कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या नमुन्यांची तपासणी झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पूजा इंगळे निकिता लोणारे यांनी नमुने घेतले होते. विद्यापीठातील प्रयोगशाळेने 59 पॉझिटिव्ह अहवालावर शिक्कामोर्तब केला आहे.
 
विद्यापीठातील 245 कर्मचारी-अधिकारी अजूनही कोरोना चाचणीपासून अद्यापही वंचित आहे. पुन्हा याच आठवड्यात वैद्यकीय अधिकारी स्मिता थोरात यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या रूग्णालयात कर्मचार्‍यांची सामूहिक कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पासून वंचित कर्मचाऱ्यांनी शिबिरात तपासणी करून घ्यावी असे आवाहन कुलसचिव तुषार देशमुख यांनी केले आहे.