रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:20 IST)

राज्यात ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

राज्यातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यापूर्वी २ जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या चार जिल्ह्यांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली आहे.
 
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज लसीकरणाची ड्राय रन घेतली जाणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून जिल्ह्यांचे, तर जिल्हास्तरावरून आरोग्य संस्था आणि लसीकरण पथकांचे यूजर आयडी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून ‘कोविन’ ॲपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप व शीतसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी १ ते ४ आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
 
या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. कोविन ॲपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना कोरोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.