२७ वर्षाच्या लढाई नंतर वीरपत्नीला न्याय अंतिम टप्प्यात
दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तसेच तिला मिळणाऱ्या पेन्शनसाठी २७ वर्षे दारोदारी भटकायला लावणाऱ्या महाराष्ट्र शासनाला अंतिमतः वीर पत्नी पेन्शनसाठी पात्र असल्याचे उच्च न्यायालयात सांगावे लागले . पुढील २ आठवडयात प्रकरण निकाली काढून पेन्शनची रक्कम वीर पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील तुळसाबाई गणपती सूर्यवंशी ह्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेला १९९० साला पासून म्हणजेच गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य सरकारे वीर जवानाच्या पत्नीला मिळणाऱ्या पेन्शनसाठी तांत्रिक कारणे काढून खेळवत असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला. अंतिमतः कंटाळून ह्या वीर पत्नीने अॅड. धैर्यशील सुतार यांचे मार्फत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून याचिका दाखल करत दाद मागितली आहे.