सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अजित पवार-संजय राऊत आमनेसामने, महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय?

महाविकास आघाडीतील दोन प्रमुख नेते – अजित पवार आणि संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आमनेसामने उभे ठाकले आहेत.
 
गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या बंडाची चर्चा सुरू होती. यादरम्यान संजय राऊत यांनी लिहिलेल्या एका अग्रलेखामुळे दोन्ही नेत्यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यांचं दिसून येत आहे.
 
दुसरीकडे, या पार्श्वभूमीवर गौतम अदानी यांनी शरद पवारांची घेतलेली भेट, उद्धव ठाकरे-शरद पवार भेट, अशा गोष्टी घडतानाही दिसून येतं.
 
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असं म्हणत एकाएकी बुचकळ्यात टाकणारं वक्तव्य केलं.
 
या सगळ्या घडामोडी सुरू असताना काँग्रेस मात्र या संपूर्ण चित्रात कुठेच दिसत नाही.
 
गेल्या महिन्यात महाविकास आघाडीने एकत्रितपणे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा दोन संयुक्त सभा घेतल्या होत्या.
 
त्या सभांना चांगला प्रतिसादही मिळाला. पण मागच्या आठवड्यातील हा घटनाक्रम पाहता महाविकास आघाडीत काय सुरू आहे, याचा ठावठिकाणा लागत नाही. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न -
 
संजय राऊतांचा लेख
शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक असलेले संजय राऊत यांनी रविवारी आपल्या रोखठोक सदरामध्ये ‘लोकशाहीची धूळधाण, फोडाफोडीचा सिझन-2’ नामक एक लेख लिहिला होता.
 
‘शिंदे गटाचे 16 आमदार बाद होतील, त्याची भरपाई म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले जातील. अजित पवारांसापासून हसन मुश्रीफांपर्यंत ईडीचा ससेमिरा लावला गेला आहे. त्याचा शेवट काय होणार, ही फेक न्यूज आहे की आणखी काही हे सत्य कसे शोधायचे,’ असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता.
 
यानंतर दोन दिवस अजित पवार यांच्या कथित बंडाबाबत जोरदार चर्चा आणि बातम्या माध्यमांमध्ये सुरू होत्या.
 
आमच्या पक्षाचं वकीलपत्र कुणी घेऊ नये – अजित पवार
पुढच्या दिवशी स्वतः अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण अखेरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं सांगितलं.
 
याचवेळी अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. राऊत यांचा ‘सामना’ शिवसेनेचं मुखपत्र आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्याच पक्षाविषयी बोलावं. आमच्या पक्षाचं वकीलपत्र कुणी घेऊ नये, असा सज्जड दम अजित पवारांनी त्यावेळी भरला होता.
 
सामना नेहमी सत्य लिहितो – संजय राऊत
अजित पवार यांनी दम भरल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. मी केवळ शरद पवारांचंच ऐकतो असं ते म्हणाले.
 
राऊत पुढे म्हणाले, “जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. मला जरी कोणी टार्गेट करत असेल तरी मी सत्यच बोलणार. मी कदापी मागे हटणार नाही. सामना नेहमी सत्य लिहितो. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ किंवा जितेंद्र आव्हाड अशी किती जणांची नावं आहेत की त्यांच्यावर यंत्रणांचा दबाव आहे.
 
“जे सत्य आहे ते मी लिहित राहणार आणि बोलतच राहणार असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. हे सत्य आहे की असत्य आहे अजित पवार यांनी सांगायला पाहिजे. या सर्व बातम्यांची मी माहिती ठेवतो यामध्ये गैर काय? मी लिहिलेलं टोकदार सत्य जर कोणाला टोचत असेल तर मी काय करु,” असंही राऊत यांनी म्हटलं.
 
कोण संजय राऊत? – अजित पवार
यानंतर अजित पवार यांना आज (21 एप्रिल) सकाळी पुन्हा यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पवार यांनी चक्क कोण संजय राऊत, असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत यांना दुर्लक्षित केलं.
 
ते म्हणाले, “माझ्याबाबत पसरवण्यात आलेल्या बातम्यांबाबत मी बोललो आहे. त्यात कुणाचंही नाव घेतलेलं नाही. मी आणि माझा पक्ष याबाबत बोललो. त्यामुळे कुणाला लागायचं काहीच कारण नाही.
 
“मी बोलताना कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. तरीदेखील काहीजण अंगावर ओढवून घेतात,” असा टोला पवार यांनी यावेळी लगावला होता.
 
यानंतर यासंदर्भात संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
 
अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो, असं राऊत त्यांच्याबाबत म्हणाले.
 
तीन दिवसांपूर्वीच आम्ही एकत्र जेवलो, आता पुन्हा एकत्र जेऊ. अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत. आमच्यात फूट पाडण्याचा हा भाजपचा डाव आहे, आम्ही हा डाव हाणून पाडू, असंही राऊत म्हणाले.
 
‘शरद पवारांच्या सांगण्यावरून...’
अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध रंगलेलं असताना भाजप खासदार अनिल बोंडेंनी एक मोठा दावा केला आहे.
 
“शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना संजय राऊत महाविकास आघाडीतून बाहेर काढतील,” असं बोंडे यांनी म्हटलं.
 
बोंडे म्हणाले, “संजय राऊत यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. शिवसेनेतले ४० आमदार फुटले ते संजय राऊत यांच्यामुळेच. अजित पवारही संजय राऊत यांना कंटाळून महाविकास आघाडी सोडतील. शिवसेना फोडण्यासाठी जसे राऊत जबाबदार आहेत तसंच महाविकास आघाडी फोडण्यासाठीही संजय राऊतच जबाबदार ठरतील.”
 
“मी फक्त मोठ्या साहेबांचंच ऐकतो. आधी शरद पवारांच्या सल्ल्याने शिवसेना फोडली आता महाविकास आघाडी फोडतील. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने चाललं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होते आहे,” असंही बोंडे यांनी म्हटलं.
 
महाविकास आघाडीचं नेमकं काय चाललंय?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी 2019 मध्ये सत्तेत आली. तेव्हापासून ही आघाडी तुटेल आणि त्यामुळे सरकार पडेल, असा दावा भाजपकडून करण्यात येत होता.
 
पण प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडी टिकून राहिली. तर, शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळेच उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं.
 
पण, सरकार जाऊनसुद्धा गेल्या नऊ महिन्यांपासून महाविकास आघाडी टिकून आहे. इतकंच नव्हे तर नंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. शिवाय, दोन एकत्रित सभाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतल्या.
 
असं असताना केवळ आठ-पंधरा दिवसांत महाविकास आघाडीमध्ये काहीतरी कुरबूर असल्याचं दिसून येत आहे.
 
याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणतात, “महाविकास आघाडीतील दोन नेते अशा पद्धतीने सार्वजनिकरित्या वाद घातलात, हे पाहून महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नाही, हे समजू शकतं.”
 
देसाई म्हणतात, “संबंधित घडामोडी आणि घटनाक्रम पाहिल्यास अजित पवार हे बंड करण्याच्या तयारीत नक्कीच होते. पण त्यांचं यंदाचंही बंड फसलेलं आहे. अर्थातच ते असं काही घडणार नव्हतं, असं म्हणत ते नाकारत आहेत. मात्र पडद्यामागे बरंच काही घडलेलं आहे.”
 
“दुसरीकडे, अदानी प्रकरणावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, दरम्यान शरद पवारांनी अदानी यांची केलेली पाठराखण आणि दोघांची भेट या मुद्द्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी “ते जुने मित्र आहेत, सहकार्य हवं असेल,” म्हणत टोला मारला होता. म्हणजे राष्ट्रवादीची चाल भाजपच्या दिशेने जात आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. तसंच गेल्या वर्षी सत्ता गेल्यानंतर अदानींनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. त्यामुळे या मुद्द्यावर तेसुद्धा कठोर नाहीत, असं वाटतं. अशा स्थितीत काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्येही काही कुरबुरी सुरू आहेत, नागपूरच्या सभेला ज्येष्ठ नेते नितीन राऊत गैरहजर राहिल्याने त्याचीही वेगळी चर्चा सुरू आहे.”
 
'काँग्रेसला दुय्यम रोल राहावा असे प्रयत्न'
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते, “सावरकर, अदानी या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये मतभेद नक्कीच आहेत. पण ते आघाडी तुटेल इतक्या टोकालाही गेलेले नाहीत.
 
“पण, आघाडीतील अंतर्गत समन्वयाचा विचार केल्यास काँग्रेसला महाराष्ट्रात दुय्यम भूमिका राहावी, असे प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधीपासूनच केलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्येही शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जसा समन्वय होता, तसा काँग्रेससोबत दिसला नव्हता. पण सध्याची परिस्थिती पाहता तिन्ही पक्षांना विजय मिळवायचा असेल, तर सोबत राहणं भाग आहे.
 
“त्यामुळे काँग्रेस ही भाजपविरुद्धचा भाग असावी, पण चेहरा नको, अशी भूमिका इतर पक्षांची राज्य आणि केंद्र पातळीवर आहे.
 
'लोकसभेपर्यंत भाजपचे प्रयत्न सुरू असतील'
तिन्ही पक्षांमधील मतभेद हा केवळ त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच नाही, तर भाजपच्या प्रयत्नांमुळेसुद्धा असू शकतो, असं मत देशपांडे यांनी व्यक्त केलं.
 
याविषयी विश्लेषण करताना ते म्हणाले, “आताचं बंड अजित पवारांना नक्कीच करायचं होतं, की कुणी त्याबाबत बातम्या पेरल्या हा एक संशोधनाचा विषय आहे. शिवाय अजित पवार यांना स्वतःला बाहेर पडायचं आहे की त्यांना कुणी बाहेर ढकलत आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.”
 
“दुसरीकडे, तिन्ही पक्षांची ही आघाडी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तोडण्याचे प्रयत्न भाजप नक्की करेल. त्याचा हा भाग आहे का, हेसुद्धा पाहावं लागेल,” असं देशपांडे म्हणाले.
 
‘16 आमदारांच्या अपात्रतेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून’
सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असं मत देसाई व्यक्त करतात.
 
देसाई यांच्या मते, “सध्या वरवर या कुरबुरी दिसत असल्या तरी महाविकास आघाडीत अधिकृत फूट पडलेली नाही. कारण, सध्या सर्वांचं लक्ष सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या लढाईकडे आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत तिथे काय घडतं, यावरही बरंच काही अवलंबून आहे. त्यामुळे कोर्टाच्या निकालानंतरच यासंदर्भातील घडामोडी वेगाने घडू शकतात. तोपर्यंत याविषयी स्पष्ट असं काही सांगता येणार नाही.”
 
“अजित पवार यांनी पक्ष सोडणार नाही, असं म्हटलं होतं, पण भाजपसोबत जाणार नाही, असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं नाही. किंवा यादरम्यानच्या काळात त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीकाही केली नाही, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, त्यामुळे काही गोष्टींचं उत्तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मिळू शकतं,” असं देसाई यांनी सांगितलं.