मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (20:25 IST)

तौक्ते चक्रीवादळ : नरेंद्र मोदींची गुजरातला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?

16 आणि 17 मे 2021 रोजी महाराष्ट्र आणि गुजरातवर तौक्ते चक्रीवादळ धडकलं. या वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठे नुकसान झालं. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये वादळामुळे मोठं नुकसान झालं.
 
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये या वादळाचा अधिक फटका बसला. महाराष्ट्रातल्या समुद्र किनारपट्टीला समांतरपणे हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकलं आणि गुजरातमध्ये धडकलं. गुजरातमध्येही या वादळामुळे मोठी पडझड झाली.
 
19 मे 2021 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा हवाई मार्गाद्वारे पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी एक हजार कोटींची मदत जाहीर केली.
गुजरातला मदत केली, मग महाराष्ट्राला मदत का नाही? गुजरातमध्ये जास्त नुकसान झाल्यामुळे फक्त गुजरातला मदत केली की यामागे राजकीय हेतू आहे? याबाबतचा बीबीसी मराठीनं आढावा घेतला आहे.
 
महाराष्ट्रात किती नुकसान झालं?
कोकण किनारपट्टीला या वादळाचा मोठा फटका बसला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी मोठे नुकसान झालं. तर मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरार या भागांनाही वादळाचा फटका बसला. राज्यात एकूण 19 जणांचा मृत्यू झाला तर 37 जण गंभीर जखमी झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. जिल्ह्यात 17 घरांची वादळामुळे पूर्णतः पडझड झाली, तर अंशतः बाधित घरांची संख्या 6,766 आहे. वार्‍यामुळे 1,042 झाडं पडली. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे.
 
रायगड जिल्ह्यात 6,626 घरांचे अंशत नुकसान झाले घराची भिंत सिमेंटचे ठोकळे आणि झाडाच्या फांद्या पडून जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. 594 वीजेचे खांब आणि 12 ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला.
मुंबईत वादळादरम्यान 114 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. यामुळे मुंबईच्या किनारपट्टीवर 153 मेट्रीक टन कचरा समुद्रातून बाहेर आला. वारा आणि पावसामुळे 812 झालं पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53 घरांची पूर्णपणे पडझड झाली. याचबरोबर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. विजेचे खांब पडल्यामुळे तीन दिवस वीज पुरवठा खंडित झाला. इतर जिल्ह्यात किरकोळ नुकसान झाल्याची नोंद आहे.
 
गुजरातमध्ये किती नुकसान झालं?
महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये तौक्ते वादळात अधिक नुकसान झालं. या वादळामुळे संपूर्ण गुजरातमध्ये एकूण 53 मृत्यू झाले. गुजरातच्या अमरेली भागात 16 जणांचा मृत्यू झाला गिर सोमनाथला दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला.
भावनगरमध्ये 8, अहमदाबादमध्ये सात खेडा आणि पंचमहाल मध्ये 3 तर राजकोट, सुरत नवसारी आनंद, वडोदरा, वलसाड आणि पठाण या ठिकाणी प्रत्येकी 1 मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या पैकी 23 महिला होत्या. या वादळात असंख्य लोकं जखमी झाले. शेकडो घरांची आणि रस्त्यांची पडझड झाली. विजेचे खांब पडून वीज गेली. असंख्य झाडं पडली.
 
गुजरातला 1 हजार कोटींची मदत
'तौक्ते' वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात, दीव, दमणचा हवाई दौरा केला. यावेळी त्यांनी गुजरातमधील नुकसानग्रस्तांना 1000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं.
'तौक्ते' वादळामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रूपयांची मदत केली जाणार आहे. जे जखमी झाले आहेत, त्यांना 50 हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
 
वादळामुळे 3,000 कोटींचं नुकसान संपूर्ण गुजरातमध्ये झाल्याचं सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
 
'हा महाराष्ट्रावरचा अन्याय'
पंतप्रधानांच्या गुजरात दीव-दमन या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा महाराष्ट्रवरचा अन्याय असल्याची टीका केली आहे.
 
पंतप्रधान मोदींनी गुजरात, दीव, दमण च दौरा केला. पण महाराष्ट्रात का आले नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, "गुजरातला एक हजार कोटींचे पॅकेज आणि महाराष्ट्र काहीच नाही हा महाराष्ट्र वरचा अन्याय आहे."
सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत या बाबत बोलताना म्हणाले, "वादळामुळे मोठे नुकसान होऊन सुद्धा पंतप्रधान गुजरात, दीव आणि दमण दौरा करतायेत. ते महाराष्ट्राचा दौरा करत नाहीयेत. कारण त्यांना माहिती आहे या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आहेत."
 
हे वक्तव्य करुन संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
 
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल मदत जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही. गुजरातचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्वच राज्यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच सर्व संबंधित राज्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे, असं भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील नुकसानाची हवाई पाहणी केल्यानंतर जी मदत जाहीर केली ती संपूर्ण देशासाठी आहे.
 
चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ही राज्ये तसेच दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली हे दोन केंद्रशासित प्रदेश यामधील वादळाच्या तडाख्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अशी मदत पंतप्रधानांनी जाहीर केली.
 
तसेच, या सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वादळामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठवल्यानंतर तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिलेली आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्याच्या बाबतीत भेदभाव केलेला नाही, असं पाटील म्हणाले.
 
निसर्ग चक्रीवादळावेळी मदत केलेली का?
निसर्ग चक्रीवादळावेळी कोकणात एकूण 18,000 हेक्टर फळबागांचं नुकसान झालं होतं तर 7000 हेक्टर शेतीचं नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 1000 कोटींच्या मदतीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने एनडीआरफ फंडातून 268 कोटींची मदत मंजूर केली होती.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला. यावेळी तोक्ते वादळात ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना राज्य सरकार मदत करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.