सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 एप्रिल 2021 (15:57 IST)

महाराष्ट्रात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

- दिपाली जगताप
महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात ही बैठक होणार असून चर्चेनंतर लॉकडॉऊनसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
 
आज संध्याकाळी पाच वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती.
 
शनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
 
"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे," अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली.
 
टास्क फोर्सच्या बैठकीत काय चर्चा होणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत लॉकडॉऊनचे संकेत दिले असले, तरी अंतिम निर्णयासाठी कोव्हिड टास्क फोर्स समितीसोबत आज बैठक होणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कृती समिती तयार केली होती. या टास्क फोर्सने याआधीच राज्यात कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असे भाष्य केले होते.
 
आता लॉकडॉऊनसंदर्भात चर्चा होत असताना कोव्हिड टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञ कोरोना रुग्णसंख्येची संभाव्य परिस्थिती याची माहिती देतील. तसंच आरोग्य यंत्रणेवरील ताण याचाही आढावा घेतला जाईल.
 
यात आरोग्य क्षेत्रातील सक्रिय मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा, बेड्स, आयसीयू सुविधा, ऑक्सीजन अशा सर्व अत्यावश्यक सेवांबाबत माहिती घेतली जाईल.
 
रुग्णसंख्या वाढीचा वेग, मृत्यूदर, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या यासंदर्भात टास्क फोर्स आपला रिपोर्टही सादर करेल.
 
रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार?
मुंबईत पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेची 95 टक्के सेवा सध्या सुरू असून विशिष्ट वेळेत सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवास करण्याची परवानगी आहे.
 
पण लॉकडॉऊन लागू झाल्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची मूभा दिली जाऊ शकते.
 
पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सध्या निर्धारित वेळेत रेल्वे प्रवास सर्व प्रवाशांसाठी खुला आहे. यात बदल करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही."
 
तसंच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातही सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुंबई लोकलमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय होऊ शकतो. तसंच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसू नये म्हणून काही लांब पल्ल्याच्या गाड्या तातडीने बंद केल्या जाणार नाहीत. अंतिम निर्णय येईपर्यंत मात्र प्रतीक्षा करावी लागेल."
 
फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण 18 लाख एवढी होती. ती आता कमी होऊन 15-16 लाखांवर आली आहे.
 
तर मध्य आणि हार्बर रेल्वेने दर दिवशी जवळपास 40 लाख प्रवासी प्रवास करत असतात, पण कोरोना काळात 20 लाख प्रवासी प्रवास असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
मध्य रेल्वेत 90 टक्के (1600) तर पश्चिम रेल्वेच्या 95% रेल्वे गाड्या सुरू आहेत.
 
राज्यात काय सुरू? काय बंद?
राज्यात 5 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यात आले आहे. त्यानुसार आताच्या घडीला राज्यात काय बंद आणि काय सुरू आहे ते पाहूया,
 
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात 144 कलम लागू.
सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.
रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत, असं निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करू शकतं.
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहतील.
किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.
बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील.
केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील.
काय बंद?
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील.
चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील.
मात्र, याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील.पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही.
टेक-अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील
खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.
ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील.
सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.
शाळा-महाविद्यालये बंद
मात्र 10 वी आणि 12 वी परीक्षांचा त्यांना अपवाद असेल.
याशिवाय, सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यावी.
चित्रपटांचं चित्रीकरण सुरू ठेवता येईल, पण जास्त गर्दी करता येणार नाही.
सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची RTPCR चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात येईल.