1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (12:28 IST)

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान

heavy rain
अमरावती विभागात वीज पडून गेल्या 30 दिवसांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मुसळधार पावसामुळे हजारो घरांची पडझड झाली असून पीकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
 
नाशिकध्ये सप्तश्रृंगी गड येथे अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि यात 7 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
 
पालघरमध्ये जव्हार, मोखाडा या दुर्गम भागांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. जव्हार तालुक्यात वांगणी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
 
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (11 जुलै) गडचिरोलीत जाऊन या भागाची हवाई पाहणी केली.
 
या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह नागपुरात आलो असता, विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील स्थितीची माहिती घेतली, नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर गडचिरोलीकडे प्रयाण केले."
 
नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावत जोरदार सुरवात केली आहे.
 
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील आश्रमशाळेत नदीचे पाणी घुसले असून अनेक विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्याने पाण्यातून काढत दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे.
 
आश्रम शाळा परिसरात जास्त प्रमाणात पाणी घुसल्याने तेथील विद्यार्थ्यांना तात्काळ दोरीच्या साहाय्याने पाण्यातून काढत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत हलवण्यात आले तर काही विद्यार्थी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर थांबले आहेत.