शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (15:18 IST)

एकहाती सत्ता मिळवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न भंगले

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 7 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने बाजी मारली. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे स्वप्न भंगले आहे. 
 
राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.
 
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.