लसीचे दोन डोस घेऊनही औरंगाबाद मनपा प्रशासक पांडेय ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
औरंगाबाद मनपाचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी कोरोनाचे दोन डोस घेऊनही ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थोडा त्रास होऊ लागल्याने पांडेय यांनी शनिवारी कोरोनाची RTPCR चाचणी केली होती. त्याचा अहवालामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे.
औरंगाबाद महापालिकेचा गाडा हाकणारे प्रशासक यांना कोरोना लसीचे डोस घेऊनही कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या औरंगाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मनपा बरखास्त झाल्याने शहराचा कारभार प्रशासक म्हणून आस्तिक कुमार पांडेय हे चालवत आहेत. परंतु तेच आता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने शहरातील परिस्थिती बाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबादमधील आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह काही प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये आता आस्तिक कुमार पांडेय यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने, काहींसे काळजीचं वातावरण निर्माण झाले आहे. आस्तिक कुमार पांडेय यांनी कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. दोन डोस घेऊन देखील ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.