1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (09:10 IST)

डिझेलच्या दरात आणखीन चार रुपयांची कपात होणार : मुख्यमंत्री

devendra fadnavis
पेट्रोलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात करण्यात आल्यानंतर राज्य सरकार डिझेलच्या दरात अजून चार रुपयांची कपात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबतची अधिसूचना शुक्रवारी उशीराने काढण्यात येणार असून निर्णयांची त्वरीत अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत कार्यक्रमानंतर ते बोलत होते.  
 
काही दिवसांपासून वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरीकांमध्ये असंतोष पसरला होता. याकडे पाहाता केंद्र सरकारने पेट्रोल दरात अडीच रुपयांची तर राज्य सरकारने अडीच रुपये असा एकूण पाच रुपयांपर्यंत दर कमी केला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने पेट्रोल पाठोपाठ डिझेलचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अधिक माहिती देतांना फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकार डिझेलच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार शुक्रवार रात्रीपासून डिझेलच्या किंमतीत चार रुपयांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. डिझेलच्या किंमतीचे दर कमी केल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडेल. मात्र ती तुट भरून काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 
याबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, ऑइल कंपन्यांच्या दर नियंत्रणसंदर्भात केंद्र सरकार धोरण तयार करीत आहे. तरीही राज्य आणि केंद्र सरकारने आर्थिक बोजा सोसून इंधनावरील दर कमी केले आहेत. सोबतच लवकरच इंधन दर कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय जीएसटी काँसिलने घेणे अपेक्षित आहे. जीएसटीत इंधनाचा समावेश केल्यास देशभरात एक सारखे दर होतील असेही त्यांनी सांगितले.