'मला सरकारमधून मोकळं करा' - देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना विनंती
काल लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यावर आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि मंथनाचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या निवडणुकीसाठी नेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी असं देवेंद्र म्हणाले आहेत.
ते म्हणाले, "मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करणार आहे."
ते म्हणाले, "ज्याप्रकारे महाराष्ट्रात जागा मिळतील असं वाटलं होतं ते झालं. नाही त्यामागे काही कारणं आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला स्वीकारलं आणि आम्हाला नाकारलं हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे. लोकांना समान मतं दिली आहेत. कुठेही आम्हाला नाकारलं असं झालेलं नाही. आम्हाला फक्त 2 लाख मतं कमी पडली आहेत. मात्र यात जागेचं अंतर जास्त असल्यामुळे मविआला 30 आणि आम्हाला 17 जागा मिळाल्या आहे. मुंबईत मविआला 4 आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या. मुंबईत मविआपेक्षा आम्हाला 2 लाख मतं जास्त आहेत. "
"या निवडणुकीवर आता मोठं ब्रेन स्टॉर्मिंग आम्ही करत आहोत, कार्यकर्त्यांनी जीव पणाला लावून काम केले. आमच्या जागा कमी झाल्या आहेत, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतली. मी आणखी तयारीने मैदानात उतरणार, नव्या तयारीने लोकांचा विश्वास संपादित करू.", असंही ते म्हणाले.