कृषी वीज बील माफी करणार वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे. वीज बिल माफ करा असे मी बोललोच नाही. वीज बिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबवावा, अशी मागणी केली होती. पण तत्कालीन ठाकरे सरकारने एक रूपयाची ही सूट शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगावी, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला आहे. मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत बोलताना ते म्हणाले, कोरोना काळात मध्यप्रदेश सरकारने वीज बिल स्थगित आणि नंतर माफ केले होते. महाराष्ट्रातही तसेच करावे, तोच पॅटर्न राबवावा, अशी मागणी मी केली होती. पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एक रुपया सूट दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलायचा अधिकारच नाही.
महावितरणने पहिल्यांदाच असं पत्र काढलं आहे की फक्त सध्याचं चालू वीज बिल घ्यायचं. थकित बिलाची मागणी करायची नाही, त्यामुळे वीजबिलाच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्यांनी जनाची आणि मनाची ही लाज बाळगावी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायालयाच्या अखत्यारित आहे. त्यावर न्यायालय निर्णय देणार असल्याने वाद निर्माण करणे योग्य नाही. हे दोन्ही राज्यांसाठी योग्य नाही. सगळ्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले.
राज यांचे विधान ऐकले नाही
महापुरुषांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी केलेलं विधानही चर्चेत आहे. त्यावर बोलताना फडणवीस यांनी आपण राज काय बोलले हे ऐकले नसल्याचे सांगितले आहे. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी काम केले आहे त्यांच्याबद्दल कोणीच खालच्या स्तरावर बोलू नये. शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आणि भारताचं दैवत, आदर्श आहेत. त्यासंबंधी कोणताही वाद होऊच शकत नाही. तसेच त्यावरुन राजकारण करणेही योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.
Edited By- Ratnadeep Ranshoor