शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (14:52 IST)

उपमुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस नाराज? या कारणामुळे चर्चा

devendra fadnavis eaknath shinde
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारली असली तरी ते प्रचंड नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, या चर्चेला अनेक बाबी कारणीभूत आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर ते राज्याचे विरोधी पक्ष नेते बनले. आणि आता राष्ट्रीय नेत्यांनी त्यांना आदेश दिल्यामुळे थेट उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना रहावे लागत आहे. ही बाब अतिशय अपमानजनक असल्याचे बोलले जात आहे. तसेच, राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री झालेली व्यक्ती उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत झाली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सर्व अकाऊंटवर कुठेही उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केलेला नाही. तसेच, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा आज वाढदिवस आहे. फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, फडणवीस यांनी त्यांच्या नावाखाली कुठल्याही पदाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे फडणवीस हे नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणे, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे लक्षणीय यश आणि आता निर्माण झालेले नवे सरकार या सर्वांमध्ये फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. असे असताना भाजपने त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्विकारायला लावून त्यांचा मोठा अपमान केल्याचे किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लावल्याचे बोलले जात आहे.