शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (14:55 IST)

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे – धनंजय मुंडे

सरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. लोक उघड उघड पैसे दिल्याचे सांगून मंत्र्यांच्या दालनात जाऊन जाब विचारत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरून मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होत आहे. हे राज्य भ्रष्टाचाराच्या बाबतीत किती पुढे गेले आहे हे या घटनेतून स्पष्ट होते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पैसे घेऊन काम केले नाही. त्यामुळे मंत्रालयातच या अधिका-याची धुलाई करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली, यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
 
उस्मानाबादमधील अरुण निटुरे यांनी या अधिका-याला मारहाण केली. आश्रम शाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानित करण्यासाठी निटुरे यांनी पैसे दिले होते. परंतु पैसे घेऊनही अधिकारी काम करत नसल्यामुळे त्यांनी या अधिका-याला मारहाण केली.
 
पैसे घेऊन काम करणारा कर्मचारी व खात्याचे मंत्री यांचा काही संबंध आहे का? हे पैसे कोणासाठी घेतले जात होते, ज्या आश्रमशाळेच्या मान्यतेसाठी व अनुदानासाठी पैसे घेतले त्याच प्रमाणे आतापर्यंत श्री. बडोले यांच्या कार्यकाळात मान्यता दिलेल्या आश्रमशाळा आणि अनुदान हे पैसे देऊन केले का? याची चौकशी करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे. लाच देणे आणि घेतल्याचे निदर्शनास येणे हा गुन्हा असल्याने या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे.