1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (16:11 IST)

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची हत्या झाली का?

Umesh Kolhe Murder
अमरावतीच्या एका मेडिकल व्यावसायिकाच्या हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
 
11 दिवसांपूर्वी अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. काही भाजप नेत्यांनी आरोप केला होता की या हत्येचे धागेदोरे नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहेत. काही दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये झालेली एका टेलरची हत्यासुद्धा याच प्रकरणाशी निगडित असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.
 
त्यामुळे आता अमरावतीच्या आणि जोधपूरच्या प्रकरणाचा थेट काही संबंध आहे का, याचा तपास NIA करणार आहे.
 
उमेश कोल्हे यांचं अमरावतीच्या तहसील कार्यालयाजवळ रचना श्री मॉलमध्ये अमित व्हेटर्नरी नावाचं एक मेडिकल दुकान आहे. 21 जूनच्या रात्री ते मेडिकल दुकान बंद करून ते घरी निघाले होते. 51 वर्षीय उमेश कोल्हे एका गाडीवर होते तर त्यांचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी दुसऱ्या गाडीवर सोबत होते.
 
तेव्हा रात्री 10.30च्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांना गाठलं, उमेश यांचा चाकूने गळा कापला आणि पळून गेले. जखमी अवस्थेत खाली पडलेल्या उमेश याना मुलगा संकेत यांनी तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
हल्ला झाले तेव्हा उमेश कोल्हे यांच्या खिशात 35 हजार रुपयाची रोकड होती. मात्र हल्लेखोरांनी त्याला हातही लावला नाही. त्यामुळे ही हत्या पैसे लुटण्यासाठी नव्हती, एवढं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं होतं.
 
आता अमरावती पोलिसांनी एक पत्रक काढून हे सांगितलंय, की उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट टाकली होती. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर ही घटना त्याच प्रकाराशी संबंधित असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले असून त्याच दिशेने आता तपास केला जातोय.
 
पोस्ट व्हायरल झाली
औषधी दुकानाचा व्यवसाय असलेले उमेश कोल्हे 'ब्लॅक फ्रिडम' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रिय सदस्य होते. या ग्रुपमध्ये हिंदुत्ववादी स्वरूपाच्या पोस्ट जास्त शेयर व्हायच्या. काही दिवसांपूर्वी उमेश कोल्हेंनीसुद्धा नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारी एक पोस्ट इथे टाकली होती.
 
अमरावती पोलिसांना संशय आहे की हीच पोस्ट ग्रुपच्या बाहेर व्हायरल झाली असावी किंवा कोल्हे यांच्या हातून चुकून एका मुस्लिम ग्रुपवर फॉरवर्ड झाल्यामुळे उमेश कोल्हे यांच्यावर हल्ला झाला.
 
उमेश कोल्हे यांची हत्या त्यांनी नुपूर शर्मा यांच्या पोस्टला समर्थन केल्याने झाली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्या दिशेने तपास करून खरं काय उघड करावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याकडे केली होती.
 
अमरावती पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी अजूनही फरार आहे, असं पोलिसांनी सांगितलंय.
 
अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी सांगतात, "उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आलीय. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर प्रथमदर्शनी दिसून येतं की, उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली होती त्या संबंधांनेच हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न होत आहे."