महाराजस्व अभियानात संगमनेर उपविभागात २७ हजार दाखल्यांचे वितरण
उपविभागीय अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराजस्व अभियानात आतापर्यंत २७०१६ दाखले वितरित करण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेरचे उप विभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २०२२ मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये करिता आवश्यक असणारे कागदपत्रे काढताना येणाऱ्या अडचणी दूर होऊन, किमान कागदपत्रात व शासकीय शूल्क दरात प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देणेच्या हेतूने संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने १३ डिसेंबर २०२१ पासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांच्या सहकार्यातून शाळा, महाविद्यालयातच शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला- १५०३२, रहिवासी दाखला- ६७, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र- ७१०२, अल्पभुधारक दाखला- १६८, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नूतनीकरण – २, जातीचा दाखला- ३२५१, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र- १२१९, ३३ टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र- ३१ व आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र – १४४ असे एकूण २७०१६ दाखले वितरित करण्यात आले. सदर शिबीरामध्ये दाखले काढणे प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना करिता यापुढील काळात देखील सदर अभियान सुरु राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच उपविभागामधील अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्रांअभावी दाखले काढण्यास अडचणी येत असतील तर त्यांनी स्थानिक मंडळ अधिकारी / तलाठी यांचेशी संपर्क करावा. जेणेकरुन त्यांना दाखले उपलब्ध करुन देणेची कार्यवाही करता येईल. असे आवाहन ही श्री.मंगरूळे यांनी केले आहे.