बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (10:15 IST)

एसटी महामंडळाकडून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार

यंदा एसटी महामंडळाच्या वतीने राज्यातील 550 बस स्थानकावर  सोमवारी (दि. 27) मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार असून विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी हा सोहळा रंगणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते आदेशानुसार एसटी महामंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन अनोख्या पध्दतीने साजरा केला जातो. येत्या सोमवारी राज्यातील प्रत्येक स्थानकावर स्थानिक आमदार, खासदार, महापौर, नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिध्द लेखकांची प्रवास वर्णनाची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रवाशांना भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
 
या कार्यक्रमासाठी संबधित शहरातील साहित्यिक, कवी, प्राध्यापक, पत्रकार यांना आमंत्रित केले जाणार आहे. एसटीच्या प्रमुख बस स्थानकावर प्रवासी व एसटीच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पुस्तकांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या दिवशी प्रत्येक बस स्थानकांची स्वच्छता करण्यात येणार असून रांगोळी काढण्यात येणार आहे, तसेच प्रवेशद्वाराची सजावट करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवाशाला मराठी भाषेतील साहित्याची ओळख व्हावी, मराठी भाषेतील गोडवा कळावा, यासाठी भाषेतील कथा आणि कवितांचे वाचन केले जाणार आहे.
 
स्वारगेट स्थानकातही होणार कार्यक्रम स्वारगेट बस स्थानकातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या प्रवक्‍त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत “मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. यावेळीप्रवासी, कर्मचारी यांना मराठी भाषेविषयी तज्ज्ञमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक नितीन मैंद, स्वारगेट आगार व्यवस्थापक सुनिल भोकरे आदी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.