रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (18:00 IST)

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा – मुंबई उच्च न्यायालय

uddhav
मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेनं ठाकरेंना दसरा मेळाव्यास परवानगी नाकारल्याचा आदेश कोर्टाने रद्द ठरवला आहे. दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (23 सप्टेंबर) सुनावणी झाली.
 
यावेळी निकाल देताना हायकोर्टानं शिंदे गटाला दणका दिला. सदा सरवणकर यांनी शिंदे गटातर्फे दाखल केलेली हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळून लावली.
 
न्यायालयानं निकाल देताना म्हटलं, "उद्धव ठाकरेंना पालिकेच्या अटी मानाव्या लागतील. ठाकरेंना 2 ते 6 ऑक्टोबर शिवाजी पार्क वापरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याचिकाकर्ता जबाबदार राहतील."
 
शिवसेना नेते काय म्हणाले?
हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे.
 
शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलं, "कोर्टानं आम्हाला दसरा मेळावा कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे. महापालिकेचे आक्षेप फेटाळले आहेत. यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेकडून अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाईल. कोर्टाच्या सगळ्या अटींचं पालन आम्ही करू."
 
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं, "न्यायालयानं जो निर्णय दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. आतापर्यंत कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. आता न्यायालयानं परवानगी दिली आहे. सगळ्या नियमांचं आम्ही पालन करणार आहोत."
 
याआधी काय घडलं?
याआधी मुंबई महानगरपालिकेने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती. दोन गटाकडून परवानगीसाठी अर्ज आल्याने आम्ही पोलिसांचा अभिप्राय मागवल्याचं पालिका प्रशासनाने म्हटलं होतं.
 
शिंदे गटाचे अर्जदार आमदार सदा सरवणकर यांच्या अर्जाला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेने म्हटलं होतं, 'कायदा आणि सुव्यवस्था यादृष्टीने आम्हाला पोलिसांचा अभिप्राय हवा होता. त्यानुसार शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने म्हटलंय की, कोणत्याही एका अर्जदाराला परवानगी दिल्यास शिवाजी पार्क संवेदनशील परिसरात कायदा,सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा पोलिसांचा अभिप्राय पाहता तुमचा परवानगी अर्ज आम्ही नामंजूर करत आहोत.'
 
दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पालिकेच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचे वकील म्हणाले, "आम्हाला आज बीएमसीची नोटीस मिळाली आहे की, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देऊ शकत नाही. आम्ही याला चॅलेंज करत आहोत."
 
उद्धव ठाकरेंचे वकील काय म्हणाले?
आज शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना सांगितलं, "दसरा मेळावा शिवसेनेकडून गेले कित्येक वर्षापासून घेतला जातो. यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाते, अनिल देसाई दरवर्षी मागणी करतात. यावेळी 20 दिवस आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली. सदा सरवणकर यांनी एक अर्ज दिला. त्यामुळे परवानगी नाकारली. हे योग्य कारण नाही.
 
"कायदा सुव्यवस्था सरकारचा प्रश्न आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावं. हे कारण देत माझा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. दसरा मेळाव्याला कधीच खंड पडला नाही. यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे कारण अत्यंत चुकीचं आहे. 2016 चा सरकारचा आदेश आम्हाला परवानगीसाठी पुरेसा आहे. "
 
यावर इतर कोणालाही त्याची परवानगी मिळू नये असं त्या आदेशात लिहिलं आहे, असा प्रश्न कोर्टाने विचारल्यावर ठाकरे यांच्या वकिलांनी नाही असं उत्तर दिलं. सदा सरवणकर यांची याचिका नामंजूर करावी, असं ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं,.
 
मुंबई महानगरपालिकेचे वकील काय म्हणाले?
पालिकेतर्फे युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी "हे मैदान शांतता क्षेत्रात मोडतं, ते खेळाचं मैदान आहे. त्यामुळे कायद्याला अनुसरुन आम्ही परवानग्या नाकारल्या आहेत, असं सांगितलं. तसेच कोणालाच मला हीच जागा हवी असं म्हणण्याचा अधिकार नाही. इथं मेळावा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा अहवाल आल्यामुळे परवानगी नाकारली", असं पालिकेच्या वकिलांनी स्पष्ट केलं.
 
एखाद्या जागेवर कुणीही आपला कायम हक्क सांगू शकत नाही, तुमच्या एकत्र येण्यावर, भाषण करण्याच्या अधिकारावर गदा आणलेली नाही, असं पालिकेनं कोर्टात सांगितलं.
 
गणपती दरम्यान दोन्ही गटांकडून दादर भागात बॅनर लावण्यात आले होते. यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण झाला आहे. असं पत्र पोलिसांनी मुंबई महापालिकेला दिलं होतं. पालिकेने हे बॅनर काढून टाकण्यास पोलिसांना सांगितलं होतं, असंही महापालिकेच्या वकिलांनी सांगितलं.
 
शिंदे गटाचे वकील म्हणाले...
 
शिदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वकील यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं की, "अनिल देसाईंची याचिका माझ्या अपरोक्ष दाखल करण्यात आली. त्यांच्याशिवाय दुसरा कोणता गट नाही असं गृहीत धरून ही याचिका दाखल केली.
 
"आता उद्धव ठाकरेंचं सरकार नाही. त्यांचं सरकार गेलं आहे. मला या याचिकेत एक पक्ष बनवण्यात यावा ही माझी मागणी आहे. मी आता सरकारमध्ये आहे. माझी याचिका शिवसेनेकडून आहे. सद्य स्थितीत राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मला पक्षातून काढून टाकण्यात आलेलं नाही. मी पक्षाचा आमदार आहे."
 
आतापर्यंत काय झालं?
एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने मुंबईतील बीकेसीच्या मैदानासाठी अर्ज करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंचा अर्ज फेटाळण्यात आला तर शिंदे गटाला सभेची परवानगी मिळाली होती.
 
त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर शिवाजी पार्क मैदानाचा पर्याय शिल्लक होता. पण काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास या मैदानाची परवानगी मिळते की नाही असंही म्हटलं जात होतं.
 
दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
पूर्वपरवानगी मागूनही मुंबई महापालिकेडून उत्तर मिळालं नाही. पालिका प्रशासनावर राज्य सरकराचा दबाव असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.
 
1966 पासून शिवसेना पक्ष म्हणून शिवाजी पार्कावर दस-याच्या दिवशी मेळावा घेते. त्यामुळे यादिवशी देशभरातील कार्यकर्ते कोणत्याही निमंत्रणाविना शिवाजी पार्कवर दाखल होतात. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी, असा दावा शिवसेनेनं याचिकेत केला आहे. या याचिकेवर काल (22 सप्टेंबर) न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
 
उद्धव ठाकरेंसोबत असलेले शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले होते की, जर एमएमआरडीचे मैदान मिळण्यासाठी प्रथम आल्यास प्रथम प्राध्यान्य हा निकष लावला असेल तर त्याप्रमाणे आम्हाला शिवाजी पार्कातील मैदान मिळावे.
 
शिवाजी पार्काच्या मैदानाबाबतचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा कुठे होईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
दोन्ही गटात राडा
'बंदुकीच्या गोळ्या, चोरीचं प्रकरण आणि सोशल मीडियावर कार्यकर्त्यांची आई-बहिणीवरून शिवीगाळ'
 
गेल्या आठवड्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतल्या दादरमध्ये दोन गटात तणावाचं वातावरण आहे. त्यात आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून वाद निर्माण झाला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 सप्टेंबर रोजी दसरा मेळाव्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलवली होती. दसरा मेळावा कुठे आयोजित करायचा यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
 
शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मुंबई महानगरपालिकेला यापूर्वीच परवानगीसाठी अर्ज देण्यात आला होता.
 
शिंदे गटाच्या आजच्या बैठकीत आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. वाय.बी. चव्हाण सेंटरला ही बैठक संध्याकाळी ही बैठक पार पडली.
 
गेल्या काही दिवसांपासून दादर, प्रभादेवी या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असताना दादर येथील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा कोणता गट दसरा मेळावा घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दादरच्या प्रभादेवी भागात असं नेमकं काय झालं की, अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकत्र असलेले कार्यकर्ते रातोरात एकमेकांना भिडले? शिंदे गटाचं दादरकडे विशेष लक्ष का आहे? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी दादर का महत्त्वाचं आहे?
 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. या निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षात दोन गट झाले आणि आता शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? असा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला.
 
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. पण आम्हीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्याच्यादृष्टीने ठाकरे आणि शिंदे गटात स्पर्धा सुरू आहे.
 
यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबईतला दादर परिसर. याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर, शिवसेना भवन आणि त्याच्यासमोरच असलेलं शिवाजी पार्क याच्याशी पक्षाचं घट्ट नातं आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केल्यानंतर दादरमध्येच घडामोडी वेगाने वाढल्या.
 
ताजी उदाहरणं द्यायची झाल्यास तीन मुद्दे आहेत, ज्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटासाठी दादर किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट होतं.
 
1. शिवाजी पार्कात दसरा मेळावा कुणाचा होणार, ठाकरे की शिंदेंचा?
 
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर काही महिन्यांनी 30 ऑक्टोबर 1966 रोजी पहिला दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कात पार पडला होता. तेव्हापासून शिवसेनेची ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.
 
दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे भाषणात काय बोलतात याकडे तमाम शिवसैनिकाचं लक्ष असायचं. त्यानंतर ही परंपरा उद्धव ठाकरे यांनीही सुरू ठेवली.
 
आता शिंदे गटाच्या बंडानंतर यंदाचा पहिला दसरा मेळावा होणार आहे. परंतु यावरूनही दोन्ही गटातलं वातावरण तापलं आहे. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू आहे.
 
दोन्ही गटाने पोलिसांकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली आहे.
 
शिवाजी पार्क शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार राहिलाय. अनेक मोठ्या घोषणा शिवसेनेने शिवाजी पार्कवर केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची आणि बाळासाहेबांची ही परंपरा पुढे नेण्यास आम्ही सक्षम आहोत हे दाखवण्याची संधी निमित्ताने शिंदे गटाला मिळालीय आणि म्हणूनच ते दसरा मेळाव्यासाठी आग्रही आहेत असं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
शीतल म्हात्रे सांगतात, "आम्ही शिवसेना आहोत त्यामुळे आमची परंपरा आम्ही का सोडायची? त्यामुळे आम्हीही दसरा मेळावा घेणार आहोत. शिवाजी पार्क येथे मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. आम्हाला संध्याकाळीच हा कार्यक्रम करायचा आहे."
 
2. 'कट्टर' कार्यकर्त्यांचे आता दोन गट
 
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. दादरमध्येच बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या घरात शिवसेनेच जन्म झाला.
 
सुरुवातीपासूनच मुंबईवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. पण दादर, प्रभादेवी, परळ, वरळी या भागात शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत असं जाणकार सांगतात.
 
त्याचं कारण म्हणजे स्थापनेनंतर 8 वर्षांनी 1974 साली दादर येथे शिवसेनेचं मुख्यालय शिवसेनाभवन झाले. पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे याच कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटत असत. त्यामुळे इथल्या आताच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढीनेही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केलंय.
 
या भागातल्या शिवसैनिकाचं म्हणूनच शिवसेनेसोबत भावनिक नातं आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनाभवनाबाहेर अनेक महिला कार्यकर्त्या संतापल्याचं तर काही भावनिक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं.
 
आता दादर-माहीम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर शिंदे गटात सामील झालेत. त्यांचे पुत्र समाधान सरवणकर याच भागात शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांमध्येही आता दोन गट तयार झाले आहेत.
 
आमदारांच्या कार्यकर्त्यांचा एक गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद वैद्य, विभाग प्रमुख महेश सावंत, माजी महापौर हेमांगी वरळीकर आणि कार्यकर्त्यांचा दुसरा गट.
 
शिवाय, हा सर्व मराठीबहुल पट्टा असल्याने शिवसेनेचे इथं एकगठ्ठा मतदार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी मराठीच्या मुद्यावर मनसेची स्थापना केल्यानंतर त्यांनाही दादरमधून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.
 
आता शिंदे गटाला आपण खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करायचं असल्यास किंवा तशी प्रतिमा जनतेतही यशस्वीरित्या उभी करायची असल्यास दादरकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आणि म्हणूनच आता शिंदे गटासाठीही दादर तितकच महत्त्वाचं बनलंय.
 
ही पार्श्वभूमी असल्यानेच प्रभादेवी येथे गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष पेटला आहे. दोन गटात बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर दादर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.
 
परंतु हे कार्यकर्ते जेव्हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला आव्हान देत म्हटलं की, "तुम्ही रस्त्यावर उतरणार असाल तर मग आम्हीही मागे राहणार नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? त्यांच्या आमदारांच्या पिस्तुलातून गोळीबार झाला आणि कारवाई मात्र आमच्यावर कार्यकर्त्यांवर होते."
 
दुसरीकडे, "दादर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण ज्यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे बालेकिल्ला कोणाचा हे तुम्हीच सांगा," अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
3. शिवसेना भवन आणि शिंदे गटाचं मुख्यालय
शिवसेनेचे मुख्य कार्यालय शिवसेनभवन दादर पश्चिम येथे आहे. आता शिंदे गटाचे कार्यालय सुद्धा इथेच जवळपास असणार आहे.
 
शिंदे गटाकडून 2-3 जागांची पाहणी यासाठी करण्यात आली आहे.
 
मुंबई महानगरपालिकेच्य जी नॉर्थ कार्यालयाजवळ एका खासगी इमारतीत शिंदे गटाचं मुख्यालय असणार आहे अशी माहिती मिळत आहे.
 
शिंदे गटातील माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी नवीन शिवसेना भवन दादर येथे उभारलं जाईल असं वक्तव्य केलं होतं.
 
दादर येथे स्वतंत्र शिवसेना भवन स्थापन करणार असं ते म्हणाले होते. सदा सरवणकर याबाबत म्हणाले होते की, "दादर येथे येत्या 15-20 दिवसांत शिंदे गटाचं हे कार्यालय सुरू करण्यात येईल. तसंच एकनाथ शिंदे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय सुरू करणार असून, त्यापैकी मुंबईचं कार्यालय दादर परिसरात असेल."

राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सांगतात," सध्या हे चित्र फक्त दादरमध्ये दिसत असलं तरी आगामी काळात इतर भागांतही दोन्ही गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे. दादर या ठिकाणी हा वाद अधिक आक्रमक झाला कारण दोन्ही गटाला 'दादर आमचं आहे' हे दाखवायचं आहे. शिंदे गटाकडूनही यासाठी वेगवेगळे प्रयत्न होतायत आणि ठाकरे गटही मागे हटायला तयार नाही कारण त्यांनाही आपली शिवसेना म्हणून प्रतिमा कायम ठेवायची आहे."
 
"दादर परिसरात दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होणं, दादरमध्ये शिंदे गटाने मुख्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करणं, दसरा मेळाव्यावर आमचा अधिकार हे सांगणं या सर्व हालचली म्हणजे 'आम्ही शिवसेना आहोत' ही प्रतिमा जनतेच्या मनात रुजवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आहेत. दोन्ही गटाकडून तसे प्रयत्न सुरू आहेत," असंही ते सांगतात.