1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (13:00 IST)

सांगली जिल्ह्यात तातडीने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

Eight days of severe lockdown in Sangli district
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल(सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली.
 
जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती जयंत पाटील यांनी केली आहे. 
 
तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहनही जयंत पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
 
दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील हे १ मे पासून सांगलीत तळ ठोकून आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही जयंत पाटील यांनी दिले.