लॉकडाऊन काळातच रेशन दुकानदार संपावर; राज्यातील ५५ हजाराहून अधिक दुकाने बंद
राज्यात कडक लॉकडाऊन सुरू असतानाच राज्यभरातील रेशन दुकानदारांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. १ मे पासून राज्यातील ५५ हजार रेशन दुकाने यामुळे बंद झाली आहेत. राज्य व केंद्र सरकारने ल़कडाऊन काळात गरिबांसाठी अन्नधान्य मोफत देण्याची घोषणा केली असतानाच रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. त्यामुळे या सर्वांना अन्नधान्य कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संपाबाबत रेशन दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर व्ही अंबुस्कर यांनी सांगितले आहे की, आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. आम्ही सातत्याने पाठपुरावा केला मात्र आम्हाला अपयश आले. राज्यभरात जवळपास २०० रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास ३ हजार दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांचा संयम संपला आहे. ना आम्हाला विम्याचे कवच आहे की अन्य काही सुविधा. तरीही आम्ही सेवा कशी देणार, असा प्रश्न अंबुस्कर यांनी विचारला आहे. ई पॉज मशिनमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यावर सक्षम आणि योग्य पर्याय शोधण्याची गरज आहे. मात्र, सरकार ही बाब गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे आमचा नाईलाज असून आम्ही संप सुरू केल्याचे अंबुस्कर यांनी स्पष्ट केले आहे.