1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Eknath Khadse's claim Amit Shah telling him to join the BJP

अमित शाहांचा फोन आला होता आणि दिल्लीला बोलावून 'भाजप जॉईन करो' असं सांगितलं, खडसेंच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. "मला स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून 'भाजप जॉईन करो' (भाजपमध्ये प्रवेश करा) असे सांगितले होते," असा जाहीर दावा खडसेंनी केला आहे. त्यांच्या या विधानाने उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
 
खडसे नक्की काय म्हणाले?
जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या रखडलेल्या चर्चेवर थेट भाष्य केले. ते म्हणाले "अनेकांना प्रश्न पडतो की खडसे नक्की कुठे आहेत? ते भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार? पण मी आज जाहीरपणे सांगतो, मला स्वतः अमित शाहांचा फोन आला होता. त्यांनी मला दिल्लीला बोलावले आणि सांगितले की, 'तुम्ही पक्षात परत या, भाजप जॉईन करो.' त्यांच्या सांगण्यावरूनच मी दिल्लीला गेलो होतो."
 
...म्हणून भाजप प्रवेश रखडला?
अमित शाहांच्या निमंत्रणानंतरही आपला भाजप प्रवेश का रखडला, यावरही खडसेंनी सूचक संकेत दिले. "केंद्रीय नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवला असला, तरी महाराष्ट्रातील काही स्थानिक नेत्यांचा माझ्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध होता. राज्यातील याच नेत्यांनी दिल्लीत जाऊन माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच हा निर्णय लांबणीवर पडला," असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला तर स्थानिक लोक काम करणार नाहीत, तसेच लोकसभेची जागा पाडून टाकू अशी थेट ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
 
'खडसे फॅक्टर' आणि आगामी निवडणुका
एकनाथ खडसे गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये परतणार अशा चर्चा सातत्याने रंगत होत्या. मात्र, लोकसभा आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींनंतर त्यांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले. आता थेट अमित शाहांच्या फोनचा संदर्भ देऊन खडसेंनी हे स्पष्ट केले आहे की, जरी ते सध्या भाजपमध्ये नसले, तरी केंद्रीय भाजप नेत्यांना अजूनही उत्तर महाराष्ट्रात त्यांची किती गरज वाटते.
 
खडसेंच्या या दाव्यानंतर आता भाजपचे प्रदेशातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील लेख
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर; शरद पवारांचा विक्रम मोडला