शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:58 IST)

केलेल्या आरोपांबाबत पुरावे द्या, एकनाथ खडसेंचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान

eknath khadse
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका करत अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून जमिनी लाटल्याचं काम केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अनुभवावरुन अजित पवारांवर आरोप केला असल्याची टीका खडसेंनी केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे द्यावे. पुरावे दिल्यास मी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत उभा राहील, असे थेट आव्हान खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.
 
खडसे यांनी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही भाजपवर निशाणा साधला. गोव्यात भाजप इतर पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर होती. मात्र यावेळी गोव्याचा राजकारणातील चित्र वेगळे आहे. आप, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा जोर चांगला दिसतोय. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला भाजपने तिकीट नाकारल्याने गोव्यात भाजपविषयी नाराजी आहे, असं मत माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मांडलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आज भाषण करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला दिशा देतील असे काही भाषण करतील, अशी अपेक्षा होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांचे भाषण हे देशाला दिशा देणारे भाषण असेल पाहिजे. मात्र पंतप्रधानांचे भाषण हे राजकीय दृष्टीकोणाचं होतं. पंतप्रधानांच्या ६० मिनिटांच्या भाषणात मोदींनी ५० वेळा काँग्रेसचे नाव घेतले. कोरोना काळात सोडलेल्या गाड्या या महाराष्ट्र सरकारने सोडल्या नसून केंद्राच्या रेल्वे बोर्डाने सोडल्या होत्या. गुजरातमधूनही श्रमिकांसाठी गाड्या सोडण्यात आल्या. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो प्रकार घडला तो दुर्दैवी, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.