शिवतारे यांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले आहेत
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही नुकतीच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत थेट शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. विजय शिवतारेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
विजय शिवतारे आणि एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे की, "मागील दोन दिवसांपासून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतायत, पक्षाच्या शक्तिस्थळांवर आघात करत आहेत. बारामती लोकसभेची जागा अपक्ष लढणार अशी घोषणा शिवतारेंनी केलीय. शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचा दावा करतात. यासाठी त्यांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा," अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.
"शिवतारे यांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपाने अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगली आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी," असंही आनंद परांजपे म्हणाले.
Edited By - Ratnadeep Ranshoor