रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (09:09 IST)

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा 'ठाणे'दार कोण?

uddhav shinde
"ठाण्याचा मुख्यमंत्री बनावा ही आनंद दिघे यांची इच्छा होती," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर "कोण कोणाचा खरा वारसदार हे थोड्या दिवसात कळेल," असं उद्धव ठाकरे यांना समर्थन देणारे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी म्हटलंय. आनंद दिघे यांच्या स्मतिदिनी दोन्ही नेत्यांनी ही वक्तव्यं केली आहेत.
 
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतरची आनंद दिघे यांचा हा पहिला स्मृतिदिन होता. त्यामुळे शिवसेनेतल्या या दोन्ही गटांसाठी राजकीयदृष्ट्या हा दिवस महत्त्वाचा होता.
 
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष तीव्र होत असताना येत्या काही दिवसांत ठाणे कुणाचं? यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ठाण्यातील शिवसेनेची परिस्थिती काय आहे? शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणासोबत आहेत? उद्धव ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात ठाण्यातून का करत आहेत? शिवसेनेचा मतदार कोणाला साथ देणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
आनंद दिघेंच्या राजकीय वारसाहक्कासाठी दोन्ही गटात रस्सीखेच
येत्या काही महिन्यांत ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होईल. जवळपास 35 वर्षांपासून ठाण्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे. पण शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व अधिक आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्याचं कारण म्हणजे ठाण्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्ह्याचे एक मोठे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीच ठाण्यात शिवसेना वाढवली.
 
एकनाथ शिंदे ठाण्यातून चार टर्म आमदार आहेत. आनंद दिघेंनंतर त्यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात एकहाती वर्चस्व आहे. परंतु शिंदे यांनीच बंड केल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठाण्यात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
 
मुंबईत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच ठाण्यात दिवंगत आनंद दिघे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. आजही ठाण्यात टेंभी नाका या परिसरात आनंद दिघे यांच्या शाखेत शेकडोच्या संख्येने लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमतात. या शाखेला 'आनंदाश्रम' असं म्हटलं जातं.
 
शुक्रवारी (26 ऑगस्ट) आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथी होती. यानिमित्त शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची लगबग तर होतीच. पण अगदी सकाळापासून आनंदाश्रमात सामान्य लोकांचीही गर्दी होती.
 
ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मुलं-मुली असे सर्व वयोगटातील लोक आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत होते. यावेळी चर्चा होती ती शिवसेनेतल्या बंडाची.
 
सकाळी 10 ते 10.30 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात येणार असा संदेश असल्याने कार्यकर्त्यांचीही तयारी सुरू होती.
 
दुसऱ्या बाजूला खासदार राजन विचारे आणि उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केलेले आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे सुद्धा 'आनंदाश्रमात' येणार असल्याची चर्चा असल्याने दोन्ही गटाचे नेते एकाच वेळी आले तर? अशीही कुजबूज सुरू होती.
 
आनंद दिघे यांचे खरे निष्ठावंत कोण? खरी शिवसेना नेमकी कोणाची मानायची? असे अनेक प्रश्न तिथे येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य लोकांच्या मनात होते.
 
शिवसेनेसाठी राजकीय परिस्थिती बदलली असली तरी आनंद दिघे यांना अभिवादन करणाऱ्यांची गर्दी कमी झालेली नव्हती आणि म्हणूनच उद्धव ठाकरे असो वा एकनाथ शिंदे दोन्ही नेत्यांसाठी आनंद दिघे यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
 
आनंद दिघे यांचं 'शक्तीस्थळ' (स्मृतीस्थळ) आनंदाश्रमापासून जवळच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही कार्यक्रम तिथेही आयोजित होते. त्यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर आणि शिंदे गटाने जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केलेले नरेश म्हस्के सुद्धा 'शक्तीस्थळा'वर पोहचणार होते. पण त्यापूर्वी खासदार राजन विचारे आणि केदार दिघे या ठिकाणी पोहचले.
 
ठाण्यातील या राजकीय समीकरणांबाबत आम्ही राजन विचारे यांच्याशी संवाद साधला. बीबीसी मराठीशी बोलताना राजन विचारे म्हणाले, "महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, त्याचा हिसाब-किताब लवकरच होईल. जे काही चाललंय ते लोकांना आवडलेलं नाही. शिवसेनेला ठाण्याने पहिली सत्ता दिली. ठाणेकर सुज्ञ आहेत. जे काही झालं ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही."
 
या ठिकाणी आनंद दिघे यांचे मोठे पोस्टर्स झळकत होते. आनंद दिघे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा एक जुना फोटोही इथे लावण्यात आला होता. 7-8 पोस्टर्सपैकी एक-दोन पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो होता. पण शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकही फोटो इथे नव्हता.
 
याविषयी बोलताना राजन विचारे म्हणाले, "फोटो काल्पनिक असतात. आनंद दिघे आमच्या ह्दयात आहेत. कोण कोणाचा राजकीय वारसा पुढे नेणार हे थोड्या दिवसात कळेल."
 
राजन विचारे गेल्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले. त्यांनी आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथे उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "धर्मवीर सिनेमा सर्वत्र पाहिला गेला. आनंद दिघे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घराघरात पोहचवण्याचं काम केलं. त्यांना केवळ ठाण्यापुरतं मर्यादित म्हणू शकत नाही. आम्ही जो इतिहास घडवला तो आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने. आम्ही लढाई लढत असताना काहींना धास्ती वाटत होती. पण ही भूमिका धर्मवीर आणि बाळासाहेबांसाठी घेतली. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा ही आनंद दिघे यांची इच्छा होती."
 
बंडानंतर ठाण्यात काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांसह बंड पुकारलं. सुरत, गुवाहटी आणि गोवा या घटनाक्रमानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले. त्यांनी आपल्या गटातील सर्व आमदारांसह थेट ठाण्यातील टेंभी नाका गाठला. आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.
 
यानंतर काही दिवसातच ठाण्यातील शिवसेनेच्या 67 नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठींबा दिला. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्त्वात या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
 
दरम्यान, नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. अपेक्षितरित्या याचे पडसाद उमटले आणि उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना ठाण्याचे जिल्हा प्रमुख म्हणून जाहीर केलं.
 
राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या एकमेव नगरसेविका उद्धव ठाकरेंच्या गटात कायम राहिल्या. दरम्यानच्या काळात राजन विचारे यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह 'मातोश्री' या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
 
ठाणे शहरातील जवळपास 9 विभाग प्रमुखांपैकी 6 जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत तर 3 जण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जातं.
 
ठाणे महानगरपालिकेत सध्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पण पालिकेतील पक्षीय बलाबल पाहिलं, तर एकूण 131 नगरसेवक आहेत. यापैकी शिवसेनेचे 67 नगरसेवक आहेत.
 
67 पैकी केवळ एक नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. भाजपचे 23, राष्ट्रवादी काँग्रेसचे 34, काँग्रेसचे 3, एमएयएमचे 2 नगरसेवक आहेत.
 
आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा शिवसेनेतल्या दोन्ही गटातून ठाण्यात विविध मार्गांनी शक्तीप्रदर्शन सुरू आहे. यंदाच्या दहीहंडी कार्यक्रमांमध्येही हे चित्र होतं. ठाण्यात शिवसेनेच्या दोन दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या आणि यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.
 
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात ठाण्यातून का करत आहेत?
गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. महाप्रबोधन रॅली असा हा दौरा असणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर संघटना पुन्हा उभी करण्याचं आव्हान ठाकरे कुटुंबासमोर आहे. गेल्या महिन्याभरापासून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा राज्यभरात फिरताना दिसत आहेत.
 
आदित्य ठाकरे यांनी नुकतीच 'शिवसंवाद यात्रा' काढली होती. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा अशा भागांत त्यांनी जनता मेळावे घेतले.
 
आता उद्धव ठाकरे सुद्धा पक्षबांधणीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. आपल्या दौऱ्याची सुरुवात ते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापासून करणार आहे. टेंभी नाका इथेच उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
 
ज्येष्ठ राजकीय पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "ठाण्यात शिवसेनेची सत्ता राखणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. त्याचं कारण म्हणजे जरी ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व ठाण्यात आहे. शिवसेनेच्या कार्यपद्धतीनुसार एखादा जिल्हा किंवा प्रांत पूर्णपणे एका नेत्याच्या हातात दिला जातो. ही कार्यपद्धती पुन्हा एकदा ठाकरेंसाठी अडचणीची ठरताना दिसत आहे. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेनेत बंड केलं होतं तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती कारण त्यावेळी राणेंचं तिथे एकहाती वर्चस्व होतं. हेच चित्र आता ठाण्यात दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दुसरी फळी उभी करावी लागणार आहे. त्यादृष्टीनेच पहिलं पाऊल म्हणून ते आपल्या दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करत आहेत."
 
तुलनेने एकनाथ शिंदे यांना ठाणे महानगरपालिकेतील सत्ता कायम ठेवणं कमी आव्हानात्मक आहे असंही ते म्हणाले. "त्याचं कारण म्हणजे आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपला चांगला जम बसवला. किमान दोन पिढ्यांना तरी एकनाथ शिंदे यांनी जवळून पाहिलं आणि वेळोवेळी त्यांना मदत केली आहे. त्यांच्या अडचणींमध्ये अगदी रात्री-अपरात्री त्यांच्या हाकेला धावून जाणं असेल किंवा प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणं असेल हे सातत्याने शिंदेंनी केलं आहे. त्यामुळे ठाण्यातली लढाई त्यांच्यासाठी सोपी आहे."
 
ते पुढे म्हणाले, "ठाण्यातल्या मतदारांचं आनंद दिघे यांच्याशी भावनिक नातं आहे जसं मुंबईत बाळासाहेब ठाकरेंबाबत आपल्याला दिसतं. एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकीय काम पुढे नेलं शिवाय बंड होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आणला. त्यामुळे आनंद दिघे यांचे राजकीय वारसदार आपण आहोत ही प्रतिमा ठाणेकरांसमोर तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला."
 
एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढाई सोपी दिसत असली तरी त्यांनी ठाकरे कुटुंबाविरोधात बंड केल्याने आणि आता उघड टीका करत असल्याने उद्धव ठाकरेंबाबत एक सहानुभूतीचं चित्र सुद्धा कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये पहायला मिळत आहे.
 
याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय पत्रकार संतोष प्रधान सांगतात, "सहानुभूती दिसत असली तरी प्रत्यक्षात त्याचं रुपांत मतांमध्ये होणं आवश्यक आहे. यासाठीच उद्धव ठाकरे यांना लोकांमध्ये फिरावं लागेल. त्यांच्याशी बोलावं लागेल. म्हणूनच ते टेंभी नाक्याला सभा घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनीही अशीच एक सभा जांभोळी मैदानात घेतली होती. त्यावेळी त्यांनी जनतेसमोर साष्टांग नमस्कार घातला आणि त्याचा मोठा परिणाम त्यावेळी दिसून आला होता."
 
ठाण्यात भाजपला वाढण्याची संधी?
ठाण्यात भाजपचे 23 माजी नगरसेवक आहेत. आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे असे भाजपचे नेते ठाण्यात सक्रिय आहे. पण यापलिकडे भाजपचा विस्तार ठाण्यात झालेला नाही. डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांना भाजपने आता मंत्रिपद दिलेलं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच पक्षाकडून केला जाणार हे स्पष्ट आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने ठाण्यात निवडणुकांसाठी बोलणी होताना काही जागांसाठी भाजप आग्रही असेल असंही जाणकार सांगतात.
 
संदीप प्रधान सांगतात, "निश्चितच भाजप आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत अधिक जागा मिळवण्यासाठी आग्रही असू शकतं. निरंजन डावखरे यांनी अलिकडेच यादृष्टीने एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने ठाण्यात भाजपचा महापौर बसेल असं ते म्हणाले होते. त्यामुळे भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भाजपसोबत सत्तेत असताना ठाण्यात भाजपला झुकतं माप द्यावं लागेल असंही चित्र दिसू शकतं. पण असं करत असताना आपली ताकद कमी होणार नाही याची काळजी एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागेल."
 
दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठं कायदेशीर आव्हान देखील आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर दावा केला आहे. ही एक मोठी न्यायालयीन लढाई असेल असं जाणकार सांगतात. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी एकनाथ शिंदे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
 
एकनाथ शिंदे यांना शह द्यायचा असेल तर उद्धव ठाकरे यांना ठाण्यात आपली पकड मजबूत करावी लागणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई असेल. एकूणच येत्या दिवसांत मुंबईप्रमाणे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचं लक्ष ठाण्यात असेल.