शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (14:32 IST)

एकनाथ शिंदे समर्थक आमदार-खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला

shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय कामाख्या मंदिराकडे रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे कुटुंबासह 150 जणांसोबत कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी चार्टर्ड विमानाने गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.
 
त्यांच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार, खासदारही आहेत.आमदार - खासदारांशी संवाद साधून ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जातील असा नियोजित दौरा आहे.
 
4 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून एकनाथ शिंदे गुवाहाटीला आले होते. गुवाहाटीहून गोव्याकडे रवाना होताना एकनाथ शिंदे आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.
 
त्यानंतर महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार असं शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार ते आज गुवाहाटीला दाखल झाले आहेत.
 
कामाख्या देवीच्या मंदिराचा इतिहास
51 शक्तीपीठातलं हे एक मंदीर आहे. या मंदीरात नवस फेडण्यासाठी कबुतरं आणि बकरीचे बळी दिले जातात. ज्यांना बळी द्यायचा नसेल ते देवीच्या चरणी बकरी किंवा कबुतरं सोडून देतात अशी प्रथा इथे प्रचलित आहे. कामाख्या देवीच्या मंदीराचे अध्यक्ष कविंद्र शर्मा यांनी ही माहिती दिली.
देवी सतीने अग्नीकुंडात उडी घेतल्यानंतर भगवान शंकर तो मृतदेह घेऊन सैरावैरा फिरत होते. त्यावेळी विष्णु देवाने त्यांच्या सूदर्शनचक्राने त्या मृतदेहाला खंडीत केले.
 
यावेळी मृतदेहांचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्यातला योनी आणि गर्भाशयाचा भाग या मंदीराच्या ठिकाणी पडल्यामुळे कामाख्या मंदीरात योनी कुंडाची पूजा केली जाते अशीही माहिती मंदीर प्रशासनाकडून दिली.
 
रोहित पवारांची टीका
सत्ता'बदला'साठी तू आशीर्वाद दिला, पण आता बदल्याची भाषा थांबावी, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कामाख्या देवीला उद्देशून केलं आहे.
 
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, “हे माता कामाख्या देवी. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता'बदला'साठी तू आशीर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं.”
“अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी. राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा. अंधश्रध्दा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये. तसंच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी. हे अडचणींचे 'डोंगार' पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे!” असंही रोहित यांनी पुढे लिहिलंय.
 
Published By-  Priya Dixit