रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (22:12 IST)

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक वार; नवी कार्यकारिणी जाहीर

uddhav shinde
शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता अतिशय आक्रमकपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिंदे यांनी सेनेची जुनी कार्यकारिणी रद्द करीत नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे यांनी स्वतःला शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून घोषित केले आहे. तर, पक्षाच्या प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करीत महाविकास आघाडीची सत्ता घालवली. त्यानंतर ते भाजपच्या पाठिंब्याच्या जोरावर मुख्यमंत्री बनले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सेनेला मोठे खिंडार पाडण्यास शिंदे यांनी प्रारंभ केला आहे. प्रारंभी ४० आमदार फोडल्यानंतर त्यांनी आता अन्य पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. सेनेचे १४ खासदारही शिंदे गटात सहभागी होत आहेत. या सर्व खासदारांना घेऊन शिंदे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची चिन्हे आहेत. त्यातच आता शिंदे यांनी पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाने शिवसेना पक्ष प्रमुख या पदाला हात न लावता कार्यकारिणी जाहीर केली आहे. मूळ शिवसेना आमचीच असल्याचे सांगत शिंदे गटाने आता पुढील पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
 
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये नेतेपदी आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांची नियुक्ती केली आहे. या दोघांनाही उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बरखास्त केले होते. शिंदे गटात उपनेतेपदी मुंबई महापालिकेचे माजी स्थायी सभापती यशवंत जाधव, माजी कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, माजी कॅबिनेट मंत्री उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक केली आहे.