राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होतील, असा अंदाज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा गेल्या एक-दोन आठवड्यात जोर धरू लागलीय. आधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीचे नेते सलीम सारंग यांनी लावलेल्या बॅनरमुळे, तर नंतर वाढदिवसाच्या सदिच्छा देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरानं सुरू झाली.
त्यातच आता पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय आणि आधीपासूनच सुरू असलेल्या चर्चांना आणखीच उधाण आलंय.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी माझ्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारावर एक राजकीय विश्लेषक म्हणून हे वक्तव्य केलेलं होतं. याबाबत माझं आकलन आजही असं आहे की, अतिशय महत्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी एक निर्णय केलेला आहे.
“ज्यानुसार त्यांना असं वाटत की सध्या मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे काही महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा प्रभाव पाडू शकलेले नाहीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभा निवडणुकांना सामोरं जाता येणार नाही. त्यामुळे आता अजित पवारांना भाजपने सोबत घेतलेलंच आहे तर त्यांना आता ती जबाबदारी द्यावी.
“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता जेव्हा एकनाथ शिंदे आणि सोळा आमदारांच्या पक्षांतराबाबत जेंव्हा निर्णय देतील, जो निर्णय 10 ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं निलंबन होईल आणि मग त्यानंतर जे पद रिक्त होईल तिथे काही व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे. कदाचित त्याआधीही हा निर्णय होऊ शकतो असं माझं आकलन आहे.”
यावेळी पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्रिपद रिक्त झाल्यावर अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री केलं जाईल. कारण महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची भाजपला गरज आहे.
“नरेंद्र मोदींची जी स्टाईल आहे 'वापरा आणि फेकून द्या' अगदी त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंची उपयुक्तता आता संपलेली आहे आणि आता पुढे कुणाची उपयुक्तता संपते ते पाहणं महत्वाचं असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याकरता एकनाथ शिंदेंच्या जागी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.”
पृथ्वीराज चव्हाण हल्ली संजय राऊतांना भेटून आलेत वाटतं - देसाई
पृथ्वीराज चव्हाणांच्या या अंदाजावर शिंदे गटातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाण हल्ली संजय राऊत यांना भेटून आलेत वाटतं. त्यांना आधीच कसं माहिती आमदार अपात्र होणार आहेत? ही कायदेशीर प्रक्रिया आहे.”
2024 पर्यंत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असं म्हणताना शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, “ट्वीट करून कोणी मुख्यमंत्री होत नसतं. ज्यांनी ट्वीट केलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की अनावधानाने ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री बनायला 145 + आमदार आवश्यक असतात असंच मुख्यमंत्री बनता येत नाही.”
“राष्ट्रवादीचे नेतेही बोलतायत, पण बोलता तर आम्हालाही येतं. पण आम्हाला आमच्या नेत्याचे आदेश आहेत नाहीतर आम्हीही बोलू शकतो,” असंही शंभुराज देसाई म्हणाले.
त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण जी पतंगबाजी करत आहेत त्याला काही अर्थ नाही. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील.”
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, बदलाची चर्चा ही पतंगबाजी - फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री बदलाची कुठली चर्चा नाही आणि कारणही नाही. जे आमच्या महायुतीतले लोक अशाप्रकारचे वक्तव्य करतायेत, त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे गोंधळ निर्माण करणं तात्काळ बंद केलं पाहिजे. कारण यातून महायुतीत संभ्रम निर्माण होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत.
"पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, तशी पतंगबाजी अनेकजण करतायेत. अनकेजण असे भविष्य वर्तवतायेत. पण त्यांनी कितीही भविष्य सांगितलं, तरी मी स्पष्टपणे सांगतो, 8 तारखेला काही होणार नाही, 9 तारखेला काही होणार नाही. झालंच तर आमचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा विस्तार होईल. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील."
बोलताना प्रत्येकानं वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे आणि वास्तव हे आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि तेच राहणार आहेत, असंही फडणवीस म्हणाले
बीबीसी प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांचं विश्लेषण
अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार अशी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे. शरद पवार गटातली राष्ट्रवादी काँग्रेसही बऱ्यापैकी हतबल झालेली दिसत आहे.
शरद पवार गटातील आमदारांची हतबल परिस्थितीचं उदाहरण द्यायचंच झालं तर जयंत पाटील अधिवेशनाला हजर तर आहेत पण काही बोलत नाहीयेत, जितेंद्र आव्हाड फक्त संध्याकाळी आले. तटकरे आणि जयंत पाटलांचा व्हीडिओ. काँग्रेसच्या आमदारांमध्येही अशी चर्चा आहे की शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी आता अजित पवारांपुढे शरणागती पत्करली आहे. जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर उर्वरित राष्ट्रवादी राहील का असा प्रश्न आहे.
शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे की २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री रहावेत असं ठामपणे वाटतं पण गेल्या काही दिवसांपासून जे काही घडतंय म्हणजेच अजित पवारांच्या वाढदिवसाला त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले पोस्टर लागणे, ट्विट करणे आणि एकनाथ शिंदेंची सहकुटुंब दिल्लीवारी यातून हाही संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार पण काँग्रेस आणि इतर पक्षांचं असं म्हणणं आहे की हा एकनाथ शिंदेंचा निरोप समारंभ होता का?
यासोबतच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य विरोधकांचं विधिमंडळातलं काम सोपं करण्यासाठीच एक रणनीति असू शकते जेणेकरून एकनाथ शिंदेंच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि सरकारला काम करताना अडचणी येतील. हे काही मुद्दे असले तरी नेमकं काय घडतंय हे १० ऑगस्ट नंतरच कळेल.
Published By-Priya Dixit