झेडपी त्रिशंकु : दोन्ही काँग्रेसची संख्या घटली
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकुस्थिती निर्माण झाली असून सत्ताधारी राष्ट्रवादीला २५ आणि काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत प्रथमच कमल फुलले असून भाजपने १७ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेनेने दक्षिणमध्ये स्वबळावर एक तर करमाळ्यात काँग्रेसच्या मदतीने चार अशा पाच जागा जिंकून दमदार एन्ट्री केली आहे. ११ पैकी सहा पंचायत समित्यांमध्ये परिवर्तन आले आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३५ जागांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले.
झेडपीतील सत्तेसाठी लागणारे बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाले नाही. गेल्यावेळी एकहाती सत्ता मिळवलेल्या राष्ट्रवादीच्या जागेत घट झाली असून त्यांना २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसर्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या आहेत. मावळत्या सभागृहात एकही सदस्य नसलेल्या भाजपने 17 व शिवसेनेने पाच पाच जागा जिंकून मुसंडी मारली आहे. शेकापला तीन ता स्थानिक आघाड्यांना आठ आणि अपक्ष तीन असे उमेदवार निवडून आले आहेत.
बार्शी, अक्कलकोट, पंढरदूर, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलले आहे, तर करमाळ्यात शिवसेनेने सर्वाधिक चार तर दक्षिणमध्ये खाते खोलत एक जागापटाविली आहे. मंगळवेढ्यात दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताड़े यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने चारपैकी तीन जागा जिंकल्या. सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाकालील महायुतीने दोन जागा पटकाविल्या आहेत. मोहोळ तालुक्यात भीमा परिवार आगाडक्षने तीन जागा जिंकल्या आहेत. माढ्यात संजय शिंदे व त्यांचे पुतणे रणजितसिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडून आले. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र शिवानंद पाटील हेही अपक्ष म्हणून विजयी झाले. शेकापने पूर्वीच्या तीन जागा या निवडणुकीत कायम राखल्या आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या करमाळा तालुक्यात पाचपैकी केवळ एक जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. भाजप स्वाभिमानी आघाडीला तेथे एकही जागा जिंकता आली नाही. मात्र त्यांच्या उमेदवारांमुळे शिवसेना काँग्रेस युतीला चार मिळाल्या.