गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:29 IST)

सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात आणि ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
 
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये १० पैसे अधिक एक रुपया २१ पैसे वाहन आकार; तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. त्यामुळे धार्मिक उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठाच घ्यावा आणि त्याजोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 
 
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले, पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची दाट शक्यता असते. 

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत व त्यांच्याशी संपर्क साधावा. सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देता येणार असून नाशिक शहर मंडल ०२५३-२३०८००३/४, मालेगाव मंडल ७८७५७६६३५१ आणि अहमदनगर मंडलातील ग्राहकांनी ०२४१-२३४०५७१ या क्रमांकांवर संपर्क साधावा अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १९१२ किंवा  १८००-२००-३४३५ अथवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. 
 
विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या व रोहित्रांचा गणेशोत्सवातील तसेच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे.वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.