गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोनगाव , गुरूवार, 10 मे 2018 (16:07 IST)

अन् चंद्रमौळी झोपडीत पोहोचला प्रकाश

फलटण तालुक्यातील जवळपास पावणेचारशे उंबरठ्याचं गाव. तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास 15 कि.मी. अंतरावरील बहुसंख्य दलित वस्ती असलेलं गाव. शेतमजुरी हेच बहुतेकांच्या उदरनिर्वाहाचं साधन. त्यामुळे दोन वेळची भ्रांत असणाऱ्या काही रहिवाशांच्या घरात स्वातंत्र्यानंतरही वीज पोहोचू शकली नव्हती. वीजजोडणी घ्यायची म्हटली तरी त्यासाठी पैसे आणायचे कुठून असा यक्षप्रश्न अनेकांसमोर पडलेला. रॉकेलवर तेवणारी चिमणी अन् कंदिलाचा अंधुक प्रकाश हेच त्यांचं प्रारब्ध होतं. असंच गावाच्या कोपऱ्यात राहणारं यशोदा व श्रीरंग माने हे वयाची जवळपास सत्तरी पार केलेलं दांपत्य. त्यांचं घर म्हणजे चंद्रमौळी झोपडी. कसायला स्वत:ची शेतजमीन नाही. घरात अठरा विश्वे दारिद्‌र्‌य.
 
हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या घरात कधीच वीज आली नव्हती. किंबहुना दुसऱ्यांच्या घरातच विजेचा दिवा पाहून समाधान मानण्यात या दांपत्यांचं अर्ध्यापेक्षा अधिक आयुष्य सरलं. रॉकेलवर चालणारा मिणमिणता दिवा हा रात्रीच्या अंधारात त्यांचा उजेडाचा एकमेव आधार होता. या दांपत्यानं दोन मुलं. दोघंही विवाहित पण गाव, परिसरात कामधंदा मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात दोघंही दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित झाले.
 
उतारवयात एकमेकांना आधार देत माने दांपत्य एकेक दिवस पुढे ढकलत होते. रॉकेलचा दिवाही कधी दगा द्यायचा. दिव्यातलं रॉकेल संपलं की ते आणायला पायपीट होत असे. ते सहजासहजी मिळालं तर ठिक, नाहीतर रात्र तशीच अंधारात काढावी लागे. पावसाळ्‌यात तर जास्तच हाल. वादळवाऱ्यात रॉकेलचा दिवाही विझायचा. अशावेळी आसपासच्या घरांतले विजेचे दिवे पाहून आपल्याही घरात वीज असती तर किती बरं झालं असतं, असा विचार या दांपत्याच्या मनाला स्पर्शून जायचा. पण स्वप्न व सत्यात अडसर होता तो आर्थिक परिस्थितीचा. श्रीरंग माने आता वयोमानानुसार थकले आहेत. त्यातून बऱ्याच वेळा ते आजारी असतात. मुलं आपल्या संसारात रममाण झाल्यानं यशोदा माने यांच्यावरच दोघांच्या संसाराचा गाडा चालवण्याची जबाबदारी. मिळेल ते मजुरीचे काम करून त्यावर दोघांची गुजराण होते. त्यामुळे इच्छा असूनही माने दांपत्य वीजजोडणी घेऊ शकत नव्हतं. वीजजोडणीचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहतं की काय, अशी चुटपूट त्यांना लागायची.
 
अशातच 14 एप्रिल 2017 ची सकाळ त्यांच्या आयुष्यात स्वप्नपूर्तीची आस घेऊन आली. देशभर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात सुरू होते. सकाळी यशोदा माने आपली घरातली कामे उरकत असताना त्यांच्या घराबाहेर वाहनातून काही अनोळखी लोक आले. असं अचानक कोण आलंय याची त्यांना उत्सुकता लागली. विचारल्यावर त्या लोकांनी सांगितले की, 'आम्ही महावितरण कंपनीचे कर्मचारी आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार ग्रामस्वराज्य अभियान राबवत आहे. त्यात विजेपासून वंचित असणाऱ्या मागास नागरिकांना सौभाग्य योजनेतून वीज मिळणार आहे. त्याचा सर्व्हे करायला आम्ही आलोय.' महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या दांपत्याची परिस्थिती जाणून घेतली. ते दारिद्र्यरेषेखालील असल्याचे समजले. त्यावर तुम्हालाही वीजजोडणी मिळणार आहे आणि तीही मोफत, असे अधिकाऱ्यांनी सांगताच यशोदा माने यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आपल्याला एकही पैसा खर्च न करता वीज मिळणार, घरातला अंधार कायमचा दूर होणार या विचाराने यशोदा माने हरखून गेल्या.
महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर व अधीक्षक अभियंता संजय साळे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता सतीश राजदीप यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता महेंद्र सूर्यवंशी, शाखा अभियंता प्रदीप थोरात, बाह्यस्रोत कर्मचारी संदीप जगदाळे, तंत्रज्ञ नीलेश कोकरे, के.डी. पावरा यांनी सोनगावात सर्वेक्षण केले. त्यात 65 घरे वीजजोडणीपासून वंचित असल्याचे आढळून आले. यातील एकही घर अंधारात राहू नये म्हणून गावात तीनवेळा लाभार्थ्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या. या लाभार्थ्यांना 5 मेपर्यंत वीजजोडणी देण्याची कालमर्यादा शासनाने निश्चित केली होती. परंतु श्री.सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करत मुदतीपूर्वीच काम पूर्ण केले. तब्बल 11 नवीन खांब व तारा बसवून 65 घरांत त्यांनी प्रकाश पोहोचवला.
 
सर्वेक्षणानंतर दुसऱ्याच दिवशी हातात विजेचे मीटर  घेऊन घराबाहेर उभे असलेले वीज कर्मचारी पाहताच यशोदा माने यांचा उजळलेला चेहरा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यपूर्तीचे समाधान देऊन गेला. अवघ्या दोन तासांत घराबाहेरच्या लाकडी मेढीवर बसवलेले विजेचे मीटर एखाद्या सौभाग्य लेण्यासारखे चमकू लागले. वायरिंग पूर्ण झाल्यानंतर यशोदा माने यांनी बटन दाबताच दिवसाही एलईडी दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघाले.
 
घरात वीज आणण्याचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल माने दांपत्याने महावितरण व सौभाग्य योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 'वीजजोडणीसाठी महावितरणकडे जावं लागलं नाही तर अधिकारीच माझ्या दारी आले आणि माझं घर उजळून निघालं. आता माझी मुलं, सुना अन् नातवंडं जेव्हा घरी येतील, तेव्हा त्यांना अंधारात राहावं लागणार नाही. लाईट आल्यामुळं आता विचूकाट्याची भीती राहिली नाही. आता उजेड आलाय', हे सांगताना यशोदा मानेंच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता. अशा हजारो, लाखो लोकांच्या घरात वीज पोहोचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हेच सौभाग्य योजनेचे फलित आहे.