शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (08:39 IST)

सराईत गुन्हेगाराला फेसबुक पोस्ट पडली महागात; ‘भाई का बड्डे’ थेट पोलीस कोठडीत

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुरापती करण्याचा मानस असल्याचा आशय असलेली पोस्ट एका सराईत गुन्हेगाराने फेसबुकवर टाकली. त्यावर त्याच्या एका चेल्याने त्याच आवेशात कमेंट देखील केली. मात्र या दोघांना आणि कथित भाईचे फेसबुक हँडल करणाऱ्या एकाला ही पोस्ट चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्या भाईचा वाढदिवस चक्क पोलीस कोठडीत गेला.
 
अजय विलास काळभोर (वय 27, रा. आडवाणी कंपनीच्या मागे, चिंचवड), अनिल प्रशांत सोनावणे (वय 24, रा. विद्यानगर, चिंचवड) आणि सोमनाथ राजू देवाडे (वय 21, रा. गणेशनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
 
अतिरिक्‍त आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी याबाबत माहिती दिली आहे, ‘बुधवारी अजय काळभोर याचा वाढदिवस होता. त्यामुळे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्याने ‘कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’, अशा आशयची पोस्ट फेसबुकवर टाकली. आरोपी देवाडे हा अजय काळभोर याचे फेसबुक अकाऊंट हाताळत होता. अजयचा साथीदार प्रशांत सोनावणे याने अजयला शुभेच्छा देताना ‘भाऊ आमचा, बाप तुमचा’ अशी पोस्ट टाकली.
 
पोलिसांची सोशल मीडियावर विशेषतः गुन्हेगारी वृत्तीच्या सराईतांवर नजर असल्याने या दोन्ही पोस्टबाबतची माहिती अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांना मिळाली. त्यांनी सराईत गुन्हेगार आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या प्रशांत सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त प्रशांत अमृतकर यांना दिले.
 
सहाय्यक आयुक्त अमृतकर यांच्या सूचनांनुसार गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी या दोन्ही गुंडांच्या मुसक्‍या आवळल्या. तसेच अजय याचे फेसबुक अकाउंट वापरणाऱ्या देवाडे यालाही अटक केली. तीनही आरोपींना बुधवारी अटक केली.