शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (08:03 IST)

परदेशात शिक्षणासाठी असलेल्या शिष्यवृत्तीला मुदतवाढ

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेंतर्गत २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२१ पर्यंत होती. यात मुदतवाढ करण्यात आली असून आता १८ जून २०२१ पर्यंत या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त (पुणे) डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
 
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने नमुन्यातील अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करून घ्यावा. हा अर्ज [email protected] या इ मेलवर पाठवून त्याची प्रत मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर द्यावी.
 
या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे आणि पीएच.डी. साठी ४०वर्षे कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान  परिषदेच्या संकेतस्थळावरील एम.डी आणि एम.एस.अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. तसेच, वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नसावे.अर्जाचा नमूना व सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट द्यावी. असे आवाहन ही नारनवरे यांनी केले आहे.