1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (10:03 IST)

फडणवीस म्हणाले की, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो, अंजली दमानिया घेत नाहीत

devendra fadnavis
छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  
 
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आक्रमकपणे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडत आहेत. काही वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक्सवर छगन भुजबळांवरील आरोपांचा संदर्भ घेत भाजपाला लक्ष्य केले आहे.
 
अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये  म्हटले आहे की, "भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
 
यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. अंजली दमानिया घेत नाहीत.  अलीकडच्या काळात अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकारचे ट्विट करत असतील. पण, भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या पक्षात आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor