बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (10:12 IST)

बाप्परे, कुटुंबात संपत्तीचा वाद, एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

मालमत्तेच्या वादातून नांदेडच्या  हदगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण कवानकर यांनी पत्नी आणि एक मुलगा आणि दोन मुलींसह यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारुन आत्महत्या केली. कवानकर कुटुंबांतील दोन भावातील मालमत्तेचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरू होता. 5 जणांपैकी तिघांची प्रेते मिळाली, दोघांचा अजूनही शोध लागला नाही, असे पोलिसांनी सांगितले. 
 
प्रवीण भगवानराव कवानकर (वय ४२), त्यांच्या पत्नी अश्विनी प्रवीण कवानकर (वय ३८), मोठी मुलगी सेजल कवानकर (वय २०), दुसरी मुलगी समीक्षा (वय १४) व लहान मुलगा सिद्धेश (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. प्रवीण कवानकर, अश्विनी कवानकर, सिद्धेश यांच्या मृतदेहाचा शोध लागला आहे. समीक्षा आणि सेजल यांचे मृतदेह सापडले नाहीत.
 
कवानकर कुटुंब दोन दिवसांपूर्वी हदगाव येथून चारचाकी वाहन भाड्याने घेवून सहस्त्रकुंड येथे पोहचले होते. कवानकर कुटुंबीयांनी मेहुणा येत आहे,असे सांगून त्यांनी वाहन परत पाठवल्याची माहिती आहे. विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली गावानजीक धबधब्यात गुरुवारी पाचही जणांनी उड्या मारून जीवनयात्रा संपविली. 
 
गवानराव कवानकर हे कवाना ता.हदगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी, हदगाव येथे त्यांचे मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलात मालमत्तेचा वाद सुरू होता. हा वाद टोकाला पोहोचला. या वादाला कंटाळून मोठा मुलगा प्रवीण यांनी कुटुंबासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून सर्वांना संपविले.