पत्नीसह सात वर्षाच्या मुलाचा खून करून बाप फरार !
राज्यातील बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाने आपल्या पत्नीसह मुलीचा खून करून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता कल्याण शहरातून अशीच एक थरारक घटना उघडकीस आली आहे. एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षांच्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव असून तो फरार झाला आहे. त्याची कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने खेळण्याची दुकाने आहेत. दीपकने स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर तीन येथील ओम दिपावली इमारतीत दीपक त्याची पत्नी अश्वीनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. दरम्यान आज दुपारी त्याने त्याच्या नातेवाईकाला फोन करून पत्नी आणि मुलाची हत्या केली. तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. नातवाईकांनी दिपक चे घर गाठले असता त्यांना घरातील दृष्य पाहून धक्काच बसला. अश्विनी व सात वर्षाचा मुलगा आदिराजचा मृतदेह दिसून आला. तर दीपक पसार झाला होता .
या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आल्यानंतर महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अश्विनी व आदिराजचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले. दीपकची कल्याण शहरात नानूस वर्ल्ड नावाने महागड्या खेळण्याची दुकाने आहेत. या प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे . पोलीस दीपक चा शोध घेत आहेत. दरम्यान दीपकने असं का केलं. हे त्याच्या अटकेनंतरच उघड होणार आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor