कौटुंबिक वाद, पित्याने केली चिमुरडीची हत्या, स्वतःचं आयुष्यही संपविले
पुण्यातील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या आशिष भोंगळे (४३) या पित्याने आपल्या आठ वर्षांच्या चिमुरडीचा जीव घेतला, त्यानंतर स्वतःचं आयुष्य संपविले आहे. आशिष रिक्षाचालक म्हणून काम करत होता. आशिषला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आशिष आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होते. त्यामुळे पती-पत्नी वेगवेगळे राहत असून दोन्ही मुलांचा सांभाळ आशिषच करतो, मात्र मोठा मुलगा शिक्षणानिमित्त बाहेरगावी आहे.
आशिषने शनिवारी रात्री आई घरात नसल्याची संधी साधून आठ वर्षांच्या श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन आशिषने आपलंही आयुष्य संपवलं. आशिषची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कौटुंबिक वादातून आशिषने टोकाचं पाऊल गाठल्याचं म्हटलं जात आहे.