संबंधित माहिती
- यवतमाळसह ३ जिल्ह्यांमध्ये ४.६ तीव्रतेचा भूकंप; हिंगोलीतील वास्मतमध्ये भिंतींना तडे गेले
- कौटुंबिक हिंसाचार, नांदेडमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गोळीबार केला
- महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी
- नांदेड मध्ये पेठकर कुटुंबाने लग्नानिमित्त ३५०० गावकऱ्यांचा विमा उतरवला, पंतप्रधानांनी कौतुक केले
- नीट यूजी पुनर्परीक्षासाठी रेल्वेचा विशेष उपक्रम; नांदेड विभागाकडून या ६ पॅसेंजर गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार
महाराष्ट्रात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA ची धाड, लाखोंचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत बेकायदा पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना आयुर्वेदिक औषधे आणि रुग्णालयांशी संलग्न असलेल्या फार्मसीमधील गंभीर नियमबाह्य बाबींचा पर्दाफाश करण्यात आला असून, तब्बल ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएचे आयुक्त पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांविरोधात त्यांनी राज्यव्यापी मोहीम उघडली आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत पुणे, नांदेड, बीड आणि सोलापूर या शहरांमध्ये छापे टाकून ९० लाख रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला.
पाकिस्तानातून आलेली बेकायदा सौंदर्यप्रसाधने
बंदी असलेला माल जप्त: केंद्र सरकारने बंदी घातलेली असतानाही, थेट पाकिस्तानातून आयात केलेली आणि 'गोरी' या ब्रँडसह विविध प्रकारची तब्बल ३८ हून अधिक प्रतिबंधित सौंदर्यप्रसाधने विकली जात असल्याचे समोर आले.
दहशतवादी कनेक्शनचा संशय: हा माल ट्रॅव्हलिंग बिझनेसच्या नावाखाली बेकायदेशीरपणे भारतात आणला गेला होता. हा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचा अँगल लक्षात घेता, यात थेट ATS आणि आर्थिक गुन्हे शाखेची (EOW) एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
विनापरवाना आयुर्वेदिक औषधे आणि दिशाभूल करणारे दावे
राज्यभरात अनेक ठिकाणी विनापरवाना आणि बनावट पद्धतीने तयार केली जाणारी आयुर्वेदिक औषधे जप्त करण्यात आली आहेत. त्वचा उजळवणे किंवा शरीराचे अवयव सुबक करणे यांसारखे दिशाभूल करणारे आणि लोकांची फसवणूक करणारे दावे करणाऱ्या क्रीम्स आणि उत्पादनांच्या साठ्यावरही एफडीएने जप्तीची कारवाई केली आहे.
रुग्णालयांमधील मेडिकल स्टोअर्सवर टाळे
सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये रुग्णालयांना जोडलेल्या औषध दुकानांची तपासणी करण्यात आली. तेथे औषध विक्रीचे नियम न पाळणे, फार्मासिस्ट हजर नसणे आणि इतर गंभीर अनियमितता आढळल्याने कडक नियामक कारवाई करण्यात आली आहे.
प्रशासनाचा इशारा: अशा प्रकारच्या बेकायदेशीर वस्तूंची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनीही कोणत्याही ब्युटी क्रीम्स किंवा औषधे खरेदी करताना ती अधिकृत आहेत की नाही, याची खात्री करावी.
