सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:32 IST)

नाशिक: तलवारीने कापला बर्थडेचा केक; सेलिब्रेशन थेट पोलीस ठाण्यात

मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थ नगर येथील एका युवकास वाढदिवशी तलवारीने केक कापणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद, सिद्धार्थ नगर येथे संशयित मयूर पितांबर सोनवणे (वय २६) यांच्याकडे तलवार असल्याची माहिती सोशल मीडियाव्दारे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांना मिळाली होती.
 
त्यानुसार म्हसरुळ गुन्हे शोध पथक अधिकारी व कर्मचारी यांनी संशयित मयूर यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली. विशेष म्हणजे मयूर सोनवणेवर कोरोना काळातदेखील रेमडीसिव्हर सापडल्याने गुन्हा दाखल होऊन जेलवारीदेखील झाली होती.
 
संशयित मयूरचा मंगळवारी (दि.१९) वाढदिवस होता. यावेळी त्याचे मित्र परिवार केक घेऊन आले. परंतु मयूर यांनी हा केक मित्रांसमवेत तलवारीने कापला. याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे छायाचित्र एका सामजिक कार्यकत्याने पोलीस व नागरिक मिळून तयार केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर शेअर केले. ते पाहून वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी यांनी म्हसरुळ पोलिसांसह संशयितास ताब्यात घेऊन त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.