शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (07:43 IST)

बेस्टच्या ५७ मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत

कोरोना लॉकडाऊनच्या काळात बेस्ट अत्यावश्यक सेवा म्हणून आपली कामगिरी बजावली. या काळात अनेक बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा जिवही गमवावा लागला. आपले कर्तव्य बजावताना बेस्टच्या १०१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यापैकी ५७ मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बेस्ट उपक्रमाकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे की अन्य कारणांमुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. त्याबाबतच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. मुंबई महापालिकेने बेस्टच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी ५० कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध केली आहे.
 
वास्तविक, बेस्टकडे नोंद झालेल्या मृत ५७ कर्मचाऱ्यांपैकी १२ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अगोदरच आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र उर्वरित ४५ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पालिकेकडून निधी प्राप्त झाल्यानंतर आर्थिक मदत करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. अनलॉकनंतर बेस्टने शंभर टक्के बेस्टचा प्रवास सुरु केला. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांत बेस्टच्या विविध विभागात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत बेस्टचे २ हजार ८०५ अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.