बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (13:36 IST)

यूपीएससी मुख्य परीक्षा, मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठीआर्थिक सहाय्य करण्याची योजना

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन आणि १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा अनुसूचित जमातीमधील एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रशासकीय अधिकारी व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. आर्थिक सहाय्याअभावी स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या अनुसूचित जमातीमधील तरुणांसाठी या योजनेचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास पाडवी यांनी व्यक्त केले आहे.