बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (09:21 IST)

पहले शेतकरी, फिर सरकार! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची केंद्र सरकारकडे मागणी

अतिवृष्टीमुळे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे, त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले असून, शेतकरी व्याकूळ झाला आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे. नवीन सरकारची औपचारिकता पूर्ण होण्याची वाट न पाहता केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांना नव्याने उभं करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे  यांनी केली आहे.
 
सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी #जिल्हा_प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरवातही झालेली नाही, असे आमदार धनंजय मुंडे म्हणाले आहेत. सरकारने तात्काळ #पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, आंदर मावळ इथे गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत माहिती मिळताच मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके  यांनी देखील मंगळवारी आंदर मावळचा दौरा केला. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एक आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही शेळके यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले.