1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (16:58 IST)

राज्यात पावसाचा कहर; पूर परिस्थिती

Hailstorms in the state
गेली आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरू आहे. रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. दी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत तर राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले आहे. राजापूर शहर जलमय झाले असून अडकलेल्या नागरिकांनी बोटीतून बाहेर काढले जात आहे. 
 
राजापुरातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून एक अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. कोदवली नदीला पूर आल्याने राजापुरात बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
आजसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अर्जुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास मुंबई- गोवा महामार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद करण्याचा इशारा
 
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या 24 तासात सरासरी 115 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक 153 मिमी पाऊस राजापूरात पडला आहे.
 
रत्नागिरी 72 मिमी, चिपळूण 123 मिमी, लांजा 123 मिमी, मंडणगड 137 मिमी, खेड 118 मिमी, दापोली 79 मिमी, गुहागर 132 मिमी आणि संगमेश्वर 102 मिमी पाऊस पडला आहे.
 
रविवारपासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं धुमाकुळ घातला असून राजापुर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. तर, अमरावती, नांदेड जिल्ह्यातही पावसानं धुमाकुळ घातला आहे.
 
खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे शुकनदीच्या पात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले आहे. यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला आहे. येथील वस्तीचा यामुळे संपर्क तुटला आहे. तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याचा वेढले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्णताह बुडाला आहे.