पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पूरस्थिती गंभीर
राज्यात अनेक भागांत संततधार सुरू आहे. मात्र, मराठवाड्यासह अनेक भागांत अजून पावसाचा जोर वाढलेला नाही. मात्र, दुसरीकडे विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती कायम असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. तसेच नदी काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
कोकणात पावसाची संततधार सुरू असून पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड नगर परिषद प्रशासन, चिपळूण नगर परिषद प्रशासन आणि महाड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. सावंतवाडीत रस्ते पाण्याखाली, राजापुरात पुराचे पाणी घुसले आहे.
कोकणात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी काही अंशी पावसाचा जोर ओसरला. परंतु पुराचा धोका वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही नद्या ओसंडून वाहात आहेत. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहे, तर काही ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor