शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (19:57 IST)

Heavy rain warning कोकण, मुंबई आणि ठाण्यात येत्या 24 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain warning in Konkan Mumbai and Thane गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार (18 जुलै) पासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे.
 
हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
 
येत्या 24 तासांमध्ये उत्तर कोकण, राडगड आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
तसंच मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
नागरिकांनी काळजी घ्यावी, घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
 
अतिवृष्टी होत असलेल्या भागांमधल्या शाळांना आणि ऑफिसेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
 
तसंच धोकादायक भागात एनडीआरएफ तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
दरम्यान डोंबिवलीजवळ ४ महिन्यांचं बाळ वाहून जाण्याची घटना दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी, कास पठार परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. साताऱ्याजवळील आंबेनळी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली. रात्री चिरेखिंडी इथे तर सकाळी दबिल टोक या ठिकाणी दरड कोसळली.
 
कोकणात काय परिस्थिती?
रत्नागिरीमध्ये वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी पाणी भरलं आहे.
 
नगरपालिकेच्या बोटी काही ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. नगरपालिकेची पथकं 9 ठिकाणी तैनात आहेत.
 
तलाठी, पोलीस आणि NDRF पथके 6 ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात 5 तलाठी, 3 पोलीस व 3 जवान आहेत. या पथकासोबत एकूण 4 बोटी आहेत.
 
कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. One way वाहतूक सुरू आहे.
 
दुसरीकडे, रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे.
 
रायगडमधील सावित्री, आंबा, पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. कुंडलिका नदीनं इशारा पातळी गाठली आहे
 
त्यामुळे आज (19 जुलै) रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हस्के यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
 
विदर्भात पावसाचा जोर
मोसमी पावसाने विदर्भात दमदार पुनरागमन केले असून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह 150 गावांचा संपर्क तुटला. 16 अंतर्गत मार्ग बंद झाले.
 
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली व मुलचेरा तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
चंद्रपूर शहरात मंगळवार सकाळी पावसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून खोल भागातील वस्त्या व शेकडो घरे पाण्याखाली गेली.
 
संभाव्य धोका लक्षात घेता आज (19 जुलै) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
 
ठाणे, बदलापूरमध्ये संततधार
ठाण्यात बुधवारी (19 जुलै) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग, महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर कोंडी झाली आहे
 
पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली आहे.
 
कर्जत, नेरळमार्गे बदलापूर आणि कल्याण तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहते आहे.
 
आपत्कालीन परिस्थितीत पालिका प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन बदलापूर पालिकेकडून केले जाते आहे. बदलापूर नगरपालिकेने 7887891202 हा क्रमांक जाहीर केला आहे.
 
अंबरनाथ रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे रुळावर पाणी आलं होतं.