मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (14:57 IST)

बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांशी वन अधिकार्‍यांची झटापट, हवेत गोळीबार

arrest
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने मोठी कामगिरी केली असून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आज झालेल्या कारवाईमध्ये इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकार्‍यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या अवयवांचा तस्करांशी 17 लाखांचा व्यवहार ठरवून सापळा रचून चौघा तस्करांस अटक केली.
 
यावेळी आपण सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तस्करांनी वन अधिकार्‍यांशी झटापट केली; मात्र वन अधिकारी बिरारीस यांनी हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
वन खात्याला वृत्त समजताच गिर्‍हाईक फसले, असे भासवून 17 लाख रुपयांमध्ये व्यवहार करण्याचे ठरविले; मात्र चार वेळा या व्यक्तींनी ठिकाणे बदलून हूल देण्याचा प्रयत्न केला. अखेर त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील आंबोली येथे हा व्यवहार करण्यासाठी पथक पोहोचले. यावेळी 17 लाख रुपये बनावट रक्कम तयार ठेवण्यात आली होती. यावेळी संबंधित व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी अधिकार्‍यांशी झटापट केली.
यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार केला. सर्व पथकाने यावेळी चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणार्‍या मोठ्या रॅकेटला गजाआड केले आहे. या रॅकेटमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर आणि नाशिक जिल्ह्यासह ठाणे व पालघर जिल्ह्यातील तस्कर असावेत, असा संशय आहे. यासह तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असावे, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. यामुळे इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून, वन विभागाच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
तस्करी करणार्‍या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, पोपट डांगे, मुज्जू शेख, त्र्यंबकेश्‍वर प्रादेशिक वनक्षेत्रातील वनरक्षक संतोष बोडके, वनपरिमंडळ अधिकारी ए. एस. निंबेकर, एम. ए. इनामदार, मधुकर चव्हाण, वनरक्षक एन ए गोरे, के. वाय. दळवी व एस. ए. पवार यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी अन्य संशयित लोकांचा शोध आणि तपास करण्यासाठी अटक केलेल्या आरोपीची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. सन 2018 मध्ये तत्कालीन वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून तस्कर ताब्यात घेतले होते.