अजित सावंत यांचे निधन
काँग्रेसचे बंडखोर नेते आणि कामगार वर्गाचे अभ्यासक अजित सावंत (६०) यांचे निधन झाले. डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये एक दबदबा निर्माण केला होता. त्यांनी मुंबई काँग्रेसचं सरचिटणीस आणि प्रवक्तेपदही भूषवलं होतं. परंतु कालांतरानं काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना पक्ष सोडावा लागला होता. अजित सावंत हे गुरुदास कामत यांचे खंदे समर्थक होते.
पक्षात काहीही किंमत नाही म्हटल्यावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपमध्ये प्रवेश केला. कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. कोकण रेल्वेसह कोकणी माणसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी 'उठवा झेंडा बंडचा' हे पुस्तकही लिहिले होते.