बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2019 (10:37 IST)

मोबाईल खरेदीत 65 कोटीचा घोटाळा, मुंडे यांचा आरोप

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी कर्मचार्‍यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या मोबाईल खरेदीत 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये किमतीचा मोबाईल आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांना खरेदी करण्यात आला असून, याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तर या स्मार्टफोनची खरेदी ही पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. त्याची किंमत ही सॉफ्टवेअर व डाटा कार्डसह असल्याचे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण विभागाने प्रसिद्धीस दिले आहे.
 
मुंडे म्हणाले की, राज्यात अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, यांच्यासाठी अँड्रॉईड मोबाईल संच खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यांची राज्यातील संख्या ही एक लाख 20 हजार 335 आहे. पूर्वी एका कंपनीने हे मोबाईलचे कंत्राट 40 कोटी रुपयांना घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आता 106 कोटी 82 लाख 13 हजार 795 रुपयांना हे संच खरेदी करण्यात आले आहेत. यामध्ये 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.