रेशन कार्डवर मिळणार मोफत साडी!
राज्यातील जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील जनतेला आता रेशन कार्डवर मोफत रेशनसोबतच मोफत साडी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सरकार एका वर्षात एक साडी मोफत देणार. .राज्य शासनाची ही योजना पांच वर्षासाठी म्हणजे 2023 ते 2028 साठी राबवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या 24, 58, 747 असून, या सर्व कार्डधारकांना वर्षभरातील एका ठराविक सणाच्या दिवशी सरकार एक साडी मोफत देणार आहे. महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार ही योजना सुरू करण्यामागे पिवळे शिधापत्रिकाधारकांचे म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे.
शासनाच्या आदेशानुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबीयांना 5 वर्षांसाठी दरवर्षी एक साडी मोफत दिली जाणार आहे.
या योजनेची राज्यात योग्य अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेंतर्गत गरीब लोकांना दिल्या जाणाऱ्या साड्या राज्य यंत्रमाग महामंडळ आणि एमएसएमई अंतर्गत नोंदणीकृत छोट्या कंपन्या बनवतील. यंत्रमाग महामंडळ या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक आणि साठवणूक यांसारख्या व्यवस्थेवरील खर्चाचे व्यवस्थापन करेल. लोकांना दिल्या जाणाऱ्या साड्यांच्या दर्जाची खात्री करण्याची जबाबदारीही या महामंडळाची असेल.
Edited by - Priya Dixit