रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:30 IST)

निवडणुकीच्या तयारीला लागा, मनसे स्वबळावर लढणार; राज ठाकरेंचे आदेश

काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीबाबत चर्चा सुरु होती. त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा असे आदेश दिले आहेत. वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातून मनसे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष हजर होते.
 
पुढील काही महिन्यात राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. युतीच्या चर्चेत न पडता स्वबळावर निवडणुकीसाठी तयार राहा. युती होईल की नाही ते पुढे बघू असं त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी वार्डनिहाय कमिटी नेमली जाणार आहे. ही कमिटी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल तयार करुन राज ठाकरेंना देणार आहे.
 
या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची टीम प्रत्येक महापालिका क्षेत्रात जाणार आणि तेथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. परंतु निवडणूक होणार की नाही हा प्रश्न आहे. ज्यावेळेला निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल तेव्हा मनसेचा जाहीरनामा पुढे येईल असं त्यांनी सांगितले.
 
मनसेत गटाध्यक्षापासून नेते मंडळीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की, आपण आतापर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. यापुढेही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी पदाधिकारी आजही सज्ज आहे. २००९ पासून आम्ही कुणाशीही युती केली नाही. जर, तर यावर राजकारणात बोलून चालत नाही. समोरुन जर प्रस्ताव आला तर बोलणी सुरुच ठेवावी लागतात. युतीचा निर्णय राज ठाकरेच घेतील. बाकी कुणीही घेऊ शकत नाही. सगळ्याच महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणूक लढवेल अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली.